सूरज कसबे, पुणे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) प्रवाशांनी अनुभवलेली ३२ तासांची कोंडी ही केवळ वाहतुकीची समस्या नव्हती, तर ते एक भीषण मृत्यूचे संकट होते. आडोशी बोगद्याजवळ उलटलेल्या प्रोपिलिन गॅसच्या टँकरमुळे संपूर्ण घाट परिसर एका जिवंत बॉम्बवर उभा होता. मात्र, बचाव पथकाने दाखवलेले चातुर्य आणि विज्ञानाचा अचूक वापर यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
आडोशी बोगद्याजवळ उलटलेल्या प्रोपिलिन गॅसच्या टँकरमुळे 10 किमी परिसराचा कोळसा झाला असता. परंतु तज्ज्ञांनी पेरूच्या झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या एका साध्या खुट्टीचा वापर करून हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले.
नेमकी घटना काय?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 22 टन प्रोपिलिन वायू घेऊन जाणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला. या अपघातात टँकरचा मुख्य व्हॉल्व्ह तुटल्याने वायूगळती सुरू झाली होती. प्रोपिलिन वायू अत्यंत ज्वलनशील असून तो रंगाने आणि वासाने ओळखता येत नाही. जर या वायूचा संपर्क आगीशी आला असता, तर 10 किलोमीटरच्या परिघात मोठा स्फोट होऊन हा घाट परिसरच नष्ट झाला असता, इतकी या दुर्घटनेची तीव्रता होती.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)
पेरूच्या लाकडाची 'कमाल'
अशा कठीण प्रसंगी मदत पथकातील तज्ज्ञांनी पारंपरिक विज्ञानाचा आधार घेतला. गळती रोखण्यासाठी चक्क पेरूच्या झाडाच्या लाकडाची खुट्टी वापरली गेली. पेरूचे लाकूडच का? असा प्रश्न अनेकांना पडेल. तर हे लाकूड मऊ आणि लवचिक असते. प्रोपिलिन वायू बाहेर पडताना तापमान -20 ते -23 अंश सेल्सिअस इतके कमी होते. ज्याप्रमाणे वाईनच्या बाटलीला बूच लावले जाते, तशी ही पेरूची खुट्टी व्हॉल्व्हमध्ये ठोकली गेली. प्रचंड थंडीमुळे लाकूड फुगले आणि वायूगळती 100% थांबली. वायूगळती रोखण्यासाठी लोखंडी किंवा इतर धातूच्या साधनांचा वापर करणे धोकादायक होते, कारण त्यामुळे ठिणगी पडून स्फोट होण्याची शक्यता होती.
(नक्की वाचा- UP News: रात्री झोपी गेलेली तरुणी बनली 'नागीण'! सकाळी बेडरुमधील दृश्य पाहून अख्ख गाव हादरलं)
36 तासांचे थरारक 'रेस्क्यू ऑपरेशन'
गळती थांबल्यानंतर टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्याचे काम तब्बल 36 तास सुरू होते. अपघातस्थळाच्या जवळूनच पेट्रोल कंपन्यांच्या मुख्य वाहिन्या गेल्या असल्याने धोका अधिक वाढला होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी हे काम फत्ते केले. टँकर चालकाने जर हाताने गळती रोखण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याच्या हातांना 'कोल्ड बर्न' होऊन ते निकामी झाले असते. या घटनेनंतर आता सोशल मीडियावर आणि प्रशासकीय वर्तुळात पेरूच्या खुट्टीची आणि मदतकार्य करणाऱ्या पथकाच्या धाडसाची चर्चा रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world