Mumbai Pune Expressway Accident: मुंबईतील बीकेसी परिसरात सिनेमा पाहिला, त्यानंतर पहाटेचा सूर्योदय पाहण्यासाठी लोणावळ्याच्या दिशेने सुसाट कार निघाली. पण हा आनंदाचा प्रवास एका भीषण अपघातात विसावेल, असे कोणालाही वाटले नव्हते. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या एका थरारक अपघातात आयआयटी मुंबईच्या 3 तरुण विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
भाड्याने घेतलेल्या फॉक्सवॅगन पोलो कारमधून हे विद्यार्थी प्रवास करत होते. भातान बोगद्याच्या पुढे अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची कार एका कंटेनरच्या मागच्या बाजूला प्रचंड वेगाने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारने रस्त्यावर अनेक कोलांटउड्या खाल्या आणि गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, ओमकुमार नितीन बोरसे हा विद्यार्थी कार चालवत होता. मध्यम मार्गिकेतून गाडी चालवत असताना डाव्या बाजूच्या स्लो लेनमधील कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात घडला. एका बस चालकाने या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. महामार्ग पोलिसांनी कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणात हितेश कुमार मीना या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संबंधित कंटेनरचा शोध घेत आहेत. कारचा अतिवेग किंवा ड्रायव्हरचा थकवा यामुळे हा अपघात झाला आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
( नक्की वाचा : Pune News :पुणेकरांची प्रतीक्षा संपणार! मे 2026 मध्ये 'या' मार्गावरून धावणार मेट्रो; पाहा काय आहे नवीन अपडेट )
आयआयटी बॉम्बेचे हिरे हरपले
या अपघातात मृत्यू झालेले तिन्ही विद्यार्थी अत्यंत हुशार आणि होतकरू होते. यामध्ये मालेगावचा 23 वर्षीय ओमकुमार नितीन बोरसे, जयपूरचा 20 वर्षीय श्रेयांश नरेश शर्मा आणि नागपूरचा 21 वर्षीय लय प्रशांत देशभ्रतार यांचा समावेश आहे.
ओमकुमार हा एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याला क्रिकेट आणि पोहण्याची प्रचंड आवड होती. तो आयआयटीच्या एंटरप्रेनरशिप सेलचा इव्हेंट को-ऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होता. दुसरीकडे, मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असलेला श्रेयांश शर्मा याला बीटेक पूर्ण केल्यानंतर आयएएस अधिकारी व्हायचे स्वप्न होते. लय देशभ्रतार हा देखील या अपघातात मृत्युमुखी पडला असून संपूर्ण आयआयटी कॅम्पसवर सध्या शोककळा पसरली आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार )
सिनेमा ते सूर्योदय असा होता प्रवासाचा बेत
हे सर्व 6 मित्र मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सिनेमा पाहण्यासाठी एकत्र आले होते. त्यानंतर अचानक त्यांनी लोणावळ्याला जाऊन सूर्योदय पाहण्याचा बेत आखला. सूर्योदय पाहून मुंबईला परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. एका क्षणात हसत्या खेळत्या मित्रांचा हा प्रवास कायमचा थांबला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world