जाहिरात

पावसाचे डोके फिरले, मुंबईकर लटकले; प्रमुख रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

 हवामान विभागाने पाऊस परतेल आणि जोरदार सरी कोसळतील असा अंदाज काही दिवसांपूर्वीही वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज यावेळी अचूक ठरला.

पावसाचे डोके फिरले, मुंबईकर लटकले; प्रमुख रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी
मुंबई:

भारतीय हवामान विभागाने बुधवारी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, रायगड यासाठी रेड अलर्ट ( Mumbai Rain Red Alert ) जारी केला होता.  हवामान विभागाने पाऊस परतेल आणि जोरदार सरी कोसळतील असा अंदाज काही दिवसांपूर्वीही वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज यावेळी अचूक ठरला. बुधवारी पावसाने मुंबईला झोडपून काढले. मुंबईला पावसाने झोडपले असले तरी त्याचे वळ मुंबईकरांच्या आणि विविध मार्गांनी प्रवास करणाऱ्यांच्या पाठीवर उमटले होते. मुंबईहून आपले घर  धावत पळत गाठण्यासाठी  नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले खरे मात्र ते तोकडे पडले. मुंबईतील सगळ्या रस्त्यांवर अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. मुंगीशी जर बुधवारी वाहनांची स्पर्धा लागली असती तर मुंगीने विजयाचे सगळे रेकॉर्ड मोडले असते. गुरुवारी देखील हवामान खात्याने मुंबई, ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला. यानंतर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर केली. 

मुंबई महापालिकेने शाळांना सुट्टी जाहीर करताना म्हटले आहे की " "भारतीय हवामान विभागाने 26  सप्टेंबर 2024 सकाळी 8.30 वाजेपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून, सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे." बीएमसी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे.

"शाळांना सुट्टी जाहीर होताच पावसाने ब्रेक घेतल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे सुट्टी जाहीर करताच पाऊस थांबतो अशा आशयाचे मीम्स त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पावसामुळे भुयारी मार्ग, सखल भाग इथे पाणी साचले होते. या भागात कंबरेइतके पाणी साचल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. मुंबईच्या काही भागात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगराच्या तुलनेत बुधवारी पूर्व उपनगरांत जास्त पाऊस झाला. दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत पूर्व उपनगरात 167 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

वीज पडून दोघांचा मृत्यू

कल्याण तालुक्यातील कांबा परिसरातील एका दगडखाणीत काम करणाऱ्या दोन कामागराचा मृत्यू झाला. वीज पडल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली आहे. राजन यादव ,बंदणा मुंडा अशी या दोघांची नावे आहेत. सदर प्रकरणाचा अधिक तपास टिटवाळा पोलीस करत आहेत. 

मध्ये रेल्वे ठप्प, विमान वाहतुकही प्रभावित

कांजूरमार्ग, नाहूर आणि भांडुपमध्ये तुफान पाऊस झाल्याने रुळांवर पाणी साचले होते. यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटीहून ठाणे, कल्याणकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रात्री 8.10 मिनिटांच्या सुमारास ही वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळाली आहे. तुफान पाऊस असल्याने समोरचे दिसण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे लोकलसेवा दुपारनंतर धीम्या गतीने सुरू होती. पावसाचा परिणाम हवाई सेवेवरही झाला होता. पावसामुळे दोन विमाने वळविण्यात आली तर सात विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आले. एअर इंडियाचे फ्लाइट (AI-656) राजकोटहून निघाले होते ते  मुसळधार पावसामुळे ते अहमदाबादकडे वळवण्यात आले. बँकॉकहून मुंबईला जाणारे इंडिगोचे विमान (6E1052) वादळी वाऱ्यांमुळे अहमदाबादकडे वळवण्यात आले. रात्री 8:15 पर्यंत वादळी वारे आणि पाऊस यामुळे 7 विमाने इतरत्र वळवावी लागली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण, घरी जाताना हाल, शाळांना सुटी जाहीर
पावसाचे डोके फिरले, मुंबईकर लटकले; प्रमुख रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Red alert in Mumbai today warning of heavy rain in many districts know rain update
Next Article
Rain Update : आजही मुंबईत रेड अलर्ट, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; काम असेल तरच घराबाहेर पडा