Mumbai Rain Alert: मुंबईसह उपनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील हवामानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईत आज (21 एप्रिल) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागांतही सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पावसासोबतच काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. अचानक होणाऱ्या या हवामान बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली किंवा मोकळ्या मैदानात जाणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात हवामानामध्ये अचानक होणाऱ्या बदलामुळे नागरिकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा: Weather Alert : 4 दिवस धोक्याचे! यात्रा, धार्मिक-सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करा; हवामान विभागाकडून अलर्ट)

Photo Credit: NDTV Marathi
पुढील 4 दिवस सावध राहा
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) 20 एप्रिल 2026 रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी सूचना | IMD Rain Alert In Marathi Maharashtra
- विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विजेची चमक दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
- झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.
- मोकळ्या जागेत मोबाइल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये.
- निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.
- शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत.
- बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे.
- यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करावे.
- नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे.
- ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी.
- रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत.
- शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्या.
- हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world