रिझवान शेख, प्रतिनिधी
येत्या काळात संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार, या AIMIM च्या नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. सहर शेख यांना या प्रकरणात पोलिसात तक्रार झाल्यानंतर लेखी माफी मागावी लागली असली, तरी आता या वादात पक्षाचे दिग्गज नेते इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे.
मुंब्रामधील एका सभेत बोलताना जलील यांनी केवळ मुंब्राच नव्हे, तर येणाऱ्या काळात आम्ही संपूर्ण राज्यात हिरवा रंग करणार असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले जलील?
सहर शेख यांच्या वक्तव्याला इम्तियाज जलील यांनी जाहीर पाठिंबा दिला. जलील म्हणाले की, आम्ही सहरला माफी मागू नको असे सांगितले होते, कारण हिरवा रंग हा काही आतंकी शब्द नाही. हिरवा रंग म्हणजे सर्वत्र हिरवळ निर्माण करणे असा त्याचा अर्थ होतो.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा ठाणे जिल्हा भगवा आहे असे म्हणतात, तेव्हा ते योग्य ठरते, मग सहरने हिरवा रंग करण्याचे बोलणे अयोग्य कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सहर शेख यांच्यावर दबाव आणला जात असून त्यांना एका दहशतवाद्यासारखी वागणूक दिली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
( नक्की वाचा : Sahar Sheikh : मुंब्र्यातील AIMIM नगरसेविका सहर शेख यांनी मागितली माफी! पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं? )
सोमय्यांवर हल्ला
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जलील यांनी अत्यंत तिखट भाषेत हल्लाबोल केला आहे. सोमय्या यांना तोतला असे संबोधत त्यांनी थेट चॅलेंज दिले आहे की, जर ते पुन्हा मुंब्र्यात आले तर त्यांची ब्लू फिल्म चौकात दाखवली जाईल.
भाजपाचे लोक गुंड मवाली असल्याचा आरोप करत जलील यांनी विचारले की, नितेश राणे मशिदीत घुसून मारण्याची भाषा करतात, तेव्हा त्यांना पोलीस नोटीस का देत नाहीत? केवळ सहर शेख यांच्यावरच कारवाई का केली जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कायद्याचा हा दुजाभाव खपवून घेतला जाणार नाही आणि सहरने जे केले त्यात काहीही चुकीचे नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
'फक्त मुस्लिमांची पार्टी नाही'
AIMIM ने या निवडणुकीत मुंबई आणि महाराष्ट्रासह एकूण 125 जागा जिंकून मोठी भरारी घेतल्याचे जलील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आमच्यावर जातीयवादाचा शिक्का मारला जातो, पण आम्ही नेहमी संविधानाच्या रक्षणासाठी बोलतो. संविधानाने दिलेला अधिकार वापरूनच आम्ही पुढे जात आहोत.
ओवौसी यांच्यापेक्षा मोठा नेता या देशात नाही आणि भाजपा केवळ सत्तेसाठी हिंदू राष्ट्राच्या बाता मारत आहे. मुंब्रा आणि कळव्यातील जनतेने दिलेला पाठिंबा आमच्यासाठी मोलाचा असून भविष्यात या भागात आम्ही केवळ आमदारच नाही तर खासदारही निवडून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
( नक्की वाचा : Jitendra Awhad : 'कैसा हराया'! जितेंद्र आव्हाडांच्या हातातून मुंब्रा निसटतंय? वाचा का सुरु झालीय चर्चा )
इम्तियाज जलील यांनी एमआयएम ही केवळ मुस्लिमांची पार्टी नसल्याचा दावा केला. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, एमआयएमने हिंदू बांधव विजय उबाळे यांना मुस्लिम भागातून निवडून आणले आणि त्यांना मुंबईत गटनेता बनवले आहे. मुंब्र्यातही आम्ही मयूर सारंग या हिंदू उमेदवाराला निवडून आणले आहे.
आमच्या 125 विजयी उमेदवारांमध्ये अनेक हिंदू बांधवांचा समावेश आहे. देशाला धर्माच्या आणि रंगाच्या नावाने वाटले जात असले तरी, आमचा उद्देश सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकास करणे हाच आहे. जे लोक पराभूत झाले आहेत, तेच सध्या अशा वादांना खतपाणी घालत असल्याची टीकाही त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना जलील म्हणाले की, जर मी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तोंड उघडले तर ते मोठ्या अडचणीत येतील. त्यांनी सध्या सत्तेचा उपभोग घ्यावा पण भाजपकडून सावध राहावे, कारण भाजपा त्यांना कधी फेकून देईल हे सांगता येत नाही. एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार, खासदार आणि मंत्री असलेल्या नेत्यांपेक्षाही जास्त जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवू आणि संपूर्ण राज्य हिरवेगार करू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world