जाहिरात

गणपती विसर्जनामुळे ईदच्या मिरवणुकांची तारीख बदलली, मुस्लिम समाजाचा कौतुकास्पद निर्णय

अडचणीच्या किंवा संकटाच्या प्रसंगी नागरिकांनी 112 नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

गणपती विसर्जनामुळे ईदच्या मिरवणुकांची तारीख बदलली, मुस्लिम समाजाचा कौतुकास्पद निर्णय
नवी मुंबई:

राहुल कांबळे

17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) असून या दिवशी 10 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन (Ganesh Visarjan 2024)  होणार आहे.  याच दिवशी ईद-इ-मिलाद (Eid e Milad) असून मुसलमान बांधव या दिवशी जुलूस काढतात. विसर्जनाला निघालेले गणेश भक्त आणि जुलूसला निघालेले मुस्लिम बांधव यांच्यात तणाव निर्माण होऊ, विसर्जन आणि जुलूस शांततेत पार पडावा यासाठी मुस्लिम बांधवांनी एक निर्णय घेतला आहे. काही मुस्लिम बांधवांनी एक दिवस आधी तर काहींनी एक दिवस नंतर मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

हे ही वाचा: बदलापूर ते मुंबई अवघ्या 40 मिनिटात

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंनी NDTV मराठी बोलताना म्हटले की, पोलिसांनी मुस्लिम बांधवांना मिरवणुकीच्या तारखा बदलण्याबाबत आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी सांगितले की झोन 2 मधील मुस्लिम बांधवांनी विसर्जनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी मिरवणूक काढायचे ठरवले आहे. झोन 1 मधील मुस्लिम बांधवांनी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढायचे ठरवले आहे. आपल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पोलीस आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. 

हे ही वाचा: नवी मुंबई विमानतळाची सिग्नल टेस्टिंग यशस्वी

पोलिसांची छुपी पथके तैनात 

पोलीस आयुक्त भारंबे यांनी गणेशोत्सव आणि विसर्जनासाठीच्या बंदोबस्ताबद्दल बोलताना म्हटले की, नवी मुंबईमध्ये  200 पेक्षा जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंद झाली आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी 4 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.  पोलिसांची गस्ती पथकेही तयार करण्यात आली असून काही पोलीस हे त्यांना नेमलेल्या ठिकाणी तैनात केले जातील.  महिला सुरक्षेला पोलिसांनी प्राधान्य दिले असून गर्दीच्या ठिकाणी महिला आणि लहान मुलांसोबत गैरप्रकार घडू नयेत यासाठी छुपी स्क्वॉड तयार करण्यात आली आहे. साध्या वेषातील पोलीस ठिकठिकाणी नजर ठेवून असतील. गर्दीत सामील होऊन ते संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर किंवा समाजविघातक प्रवृत्तींवर लक्ष ठेवून असतील आणि त्यांना आळाही घालण्याचे काम करतील. अडचणीच्या किंवा संकटाच्या प्रसंगी नागरिकांनी 112 नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: