Hotel Chaitanya Dadar, Gypsy Chinese – Gypsy Corner Restaurant : अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धाचा भडका उडाला असून याच्या झळा जगभरातील देशांला सहन कराव्या लागत आहे. व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा तुटवडा (Commercial Gas Supply Issues) निर्माण झाल्यामुळे भारतातील कारखाने, व्यावसायिकांसह हॉटेल चालकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
मुंबईमध्ये निर्माण झालेल्या व्यावसायिक गॅसच्या तुटवण्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या हॉटेलने गॅस वाचवण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले आहेत.दादरमधील मासांहारींचं आवडतं चैतन्य मालवणी हॉटेलला याचा फटका बसला आहे. चैतन्यच्या व्यवस्थापकांनी यादीतून अनेक पदार्थ हटविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय शिवाजी पार्काजवळील जिप्सी चायनिज आणि जिप्सी कॉर्नर या रेस्टॉरंटनीही मोठा निर्णय घेतला आहे.
मटण बंद, बोबिंलही मिळणार नाही; चैतन्य व्यवस्थापकांचा मोठा निर्णय...
व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे चैतन्य मालवणी हॉटेल व्यवस्थापकांनी मेन्यूतील काही पदार्थ तात्पुरत्या स्वरुपात हटविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पदार्थांना शिजण्यासाठी जास्त गॅस लागतो असे पदार्थ प्रामुख्याने हटवण्यात आले आहेत. त्यामुळे चैतन्यमध्ये जेवायला गेला तर तुम्हाला मटण आणि बोंबिलचा आनंद घेता येणार नाही. याशिवायही अनेक पदार्थ बंद करण्याचा निर्णय चैतन्य मालवणी हॉटेलच्या व्यवस्थापकांनी घेतला आहे. (Hotel Chaitanya Dadar Online delivery Closed)
जिप्सी कॉर्नरचं पावभाजी काऊंटर बंद....
शिवाजी पार्काजवळील प्रसिद्ध रेस्टॉरंट जिप्सी चायनिज आणि जिप्ली कॉर्नरला गॅस तुटवड्याचा फटका बसला आहे. त्यांनी आपल्या मेन्यूतील अनेक पदार्थ हटविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जिप्सी कॉर्नरची ओळख असलेलं लाईव्ह पावभाजी काऊंटरदेखील गॅस उपलब्ध नसल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. (Gypsy Chinese - Gypsy Corner Online delivery Closed)
ऑनलाइन डिलिव्हरी बंद...
मुंबईतील प्रसिद्ध अशा चैतन्य मालवणी हॉटेल आणि जिप्सी चायनिज आणि जिप्सी कॉर्नर या रेस्टॉरंटनी वाढती मागणी पाहता ऑनलाईन फूड डिलिव्हरी ही पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोळशावर अन्नपदार्थ शिजवण्याची परवानगी द्यावी...
हॉटेल व्यवसायिक आणि आहार सदस्य असणाऱ्या आदिती निमय यांनी अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये सरकारने हॉटेलमध्ये कोळशावर अन्नपदार्थ शिजवण्याची परवानगी द्यावी तसेच घरगुती गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यास तो हॉटेलमध्ये वापरायची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world