जाहिरात

Nagpur News: अजब चोरी! प्रेयसीला iPhone देण्यासाठी 11 लाखांचे लक्झरी नळ चोरले; अन् कवडीमोल भावात विकले

Nagpur News: नागपूरच्या कळमना परिसरात आपल्या प्रेयसीला महागडा आयफोन गिफ्ट करण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी गोदामातून ११ लाखांचे लक्झरी डिझायनर नळ चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nagpur News: अजब चोरी! प्रेयसीला iPhone देण्यासाठी 11 लाखांचे लक्झरी नळ चोरले; अन् कवडीमोल भावात विकले

आपल्या प्रेयसीला महागडा आयफोन (iPhone) मोबाईल भेट देण्याच्या हव्यासापोटी दोन अल्पवयीन मुलांनी चक्क एका गोदामावर दरोडा टाकत 11 लाखांची चोरी केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. नागपूर शहराच्या कळमना पोलीस तपास पथकाने अवघ्या 12 तासांच्या आत या चोरीचा पर्दाफाश केला असून, 6.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोदामाचे पत्रे उचकटून दरोडा

लकडगंज येथील रहिवासी राहुल जयचंद बत्रा यांचे चिखली कळमना येथील दालमील रोडवर 'राहुल सिरॅमिक्स प्रा. लिमिटेड' नावाचे टाईल्स, सॅनेटरी आणि सीपी फिटिंगच्या घाऊक विक्रीचे गोदाम आहे. 27 ते 28 मे च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या गोदामाच्या छताचे टिनचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गोदामातून तब्बल 11,39,710 रुपयांचे अत्यंत महागडे सॅनेटरी आणि लक्झरी डिझायनर साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी राहुल बत्रा यांच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(नक्की वाचा-  मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)

पोलिसांचा वेगवान तपास

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून कळमना पोलिसांचे एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपास पथकाने तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करत वेगाने तपास सुरु केला. पोलिसांनी परिसरातील सुमारे 20 ते 35 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. स्थानिक बातमीदारांकडून संशयास्पद हालचालींची माहिती गोळा करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी समांतर तपास करत संशयितांवर पाळत ठेवली आणि अखेर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

आयफोनसाठी 11 लाखांची चोरी

पोलिसांनी या प्रकरणात एका मुख्य आरोपीसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलांची कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरीमागील धक्कादायक कारण सांगितले. आपल्या प्रेयसीला महागडा आयफोन मोबाईल खरेदी करून द्यायचा होता आणि त्यासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे चोरी केलेले 11 लाखांचे लक्झरी डिझायनर नळ त्यांनी एका फेरीवाल्याला केवळ 20 हजार रुपयांत विकले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 38 वर्षीय मुख्य आरोपीचे नाव इरफान अली उर्फ इम्मु रमजान अली असे आहे, तर इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

(नक्की वाचा-  Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)

जप्त करण्यात आलेल्या महागडं साहित्य

  • सोनेरी रंगाचे डिझाईन असलेले नळ 5 नळ (3,94,500 रुपये)
  • सोनेरी रंगाचे नळ - 3 नळ (67000 रुपये)
  • रोज गोल्ड रंगाचे नळ- 9 नळ (1,30,500 रुपये)
  • सिल्वर रंगाचे नळ- 4 नळ (58000 रुपये)
  • एकूण जप्त मुद्देमाल 21 नळ (6,50,000 रुपये)
     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com