डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या जागेवर तीन मजली भूमिगत पार्किगच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ सुरू आहे. आज मोठ्या संख्येने आंदोलका दीक्षाभूमी येथे जमा झाले होते. त्यांनी भूमिगत पार्किगला विरोध केला आहे. यावेळी तेथे तयार करण्यात आलेला लोखंडी ढाचा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय काही जाळपोळीच्या घटना घडल्याचंही समोर आलं आहे.
नागपूर-दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगला आंदोलकांकडून विरोध केला जात आहे. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून स्मारक समिती आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यातही या जागेवर निवासी व्यवस्था उभारा किंवा इतर सुविधा उभारा असं आंदोलकांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र भूमिगत पार्किंगला त्यांचा विरोध आहे. यामुळे ऐतिहासिक स्तूपाला धोका असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठी तलाठी कार्यालये फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद
भूमिगत पार्किंगला का होतोय विरोध?
तीन मजली भूमिगत पार्किंग स्तूपाच्या जवळ असल्याने त्याला धोका असल्याची भूमिका आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे. दीक्षाभूमी परिसरात खोदकाम केल्यामुळे येथील ऐतिहासिक बोधी वृक्ष नष्ट होण्याची भीती आहे. नागपूरचे आंबेडकरी कार्यकर्ते संजू लोखंडे यांनी एका स्थानिक संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, आज दीक्षाभूमीकडे पाहिल्यास येथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम होणार असल्याचं स्पष्ट होतं. आज येथे उत्खनन केलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला जवळपास स्तूपाचा स्पर्श झाला आहे. हे पाहून मला प्राचीन काळातील साकेतची आठवण होते. ज्यावेळी अलेक्झांडर कनिंगहॅमच्या म्हणण्यानुसार मोठमोठे मठ खोदून मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेले होते. नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. हे उत्खनन थांबवले नाही तर आपला स्तूप वाचवता येणार नाही. हे पार्किंग जमिनीच्या आत तीन मजल्यांपर्यंत खोल असेल आणि जमिनीच्या वर अनेक मजले असतील. याची उभारणी व्यावसायिकदृष्ट्या केली जात आहे. येथे मोठे मॉल किंवा गोदाम तयार करतील. यामुळे दीक्षाभूमी दुर्लक्षित राहील. यामुळे जमिनीवर लाखो लोक एकत्र येऊ शकणार नाहीत किंवा पुस्तकांची विक्री करता येणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world