जाहिरात

Nagpur News : नागपुरात भाडेकरूचा खुनी खेळ! जुन्या घरमालकावर तलवार अन् चाकूने सपासप वार, कारण काय?

Nagpur News : या घटनेमुळे भाडेकरू ठेवताना त्याची योग्य ती खातरजमा करणे किती गरजेचे आहे, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Nagpur News : नागपुरात भाडेकरूचा खुनी खेळ! जुन्या घरमालकावर तलवार अन् चाकूने सपासप वार, कारण काय?
Nagpur News : नागपूर पोलिसांनी पोलिसांनी आरोपी रोशन तराळला ताब्यात घेतले आहे.
नागपूर:

Nagpur News : नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिक हादरले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगर भागात मंगळवारी सकाळी एका माथेफिरू माजी भाडेकरूने जुन्या घरमालकाच्या घरात घुसून तलवार आणि चाकूने  हल्ला केला. या रक्तरंजित घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे भाडेकरू ठेवताना त्याची योग्य ती खातरजमा करणे किती गरजेचे आहे, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

अमर नगरात राहणाऱ्या धर्मपाल दहाट यांच्या घरात रोशन नीलकंठ तराळ हा तरुण पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. घरात असताना मोठ्या आवाजात रेडिओ आणि गाणी वाजवण्याची त्याची सवय होती. या कारणावरून घरमालक धर्मपाल दहाट त्याला अनेकदा बोलत असत. हे दटावणे सहन न झाल्याने रोशनने घर तर सोडले, मात्र त्याच्या मनातील राग कायम होता. जुन्या घरमालकाला धडा शिकवण्याच्या हेतूने तो मंगळवारी सकाळी पूर्ण तयारीनिशी दहाट यांच्या घराजवळ पोहोचला.

रोशन तराळने अचानक दहाट यांच्या घरात घुसून तलवार आणि चाकूने हल्ला चढवला. हातात शस्त्रे घेऊन त्याने धर्मपाल दहाट आणि त्यांची पत्नी वनिता दहाट यांच्यावर सपासप वार केले. यावेळी दहाट यांच्या घरी पाहुणी म्हणून आलेली त्यांची मेहुणी संगीता चौधरी यांनी मध्ये पडून हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, संतापलेल्या रोशनने संगीता यांच्या गळ्यावर थेट तलवारीचा जोरदार वार केला. गळा कापला गेल्यामुळे संगीता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर दहाट दांपत्य गंभीर जखमी झाले.

( नक्की वाचा : Dombivli News: 'त्या'रात्री काय घडलं?डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील अहवाल सादर, रमेश म्हात्रेचं काय होणार? )

रक्ताने माखलेला थरार सीसीटीव्हीत कैद

हल्ल्याचे भीषण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आरोपी हातात तलवार घेऊन मागे धावत असताना आणि अमानुषपणे वार करत असताना स्पष्ट दिसत होते. शेजारी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो तलवार फिरवत असल्याने नागरिक प्रचंड घाबरले. हल्ला करून थकल्यानंतर आरोपी रोशन दहाट यांच्याच घरात सोफ्यावर जाऊन बसला. ही संधी साधून प्रसंगावधान दाखवत शेजाऱ्यांनी घराचे दार बाहेरून लावले आणि पोलिसांना पाचारण केले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी रोशन तराळला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी धर्मपाल आणि वनिता दहाट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

( नक्की वाचा : Video Call Murder: पत्नीला गळफास देत असताना पतीने केला व्हिडिओ कॉल; जन्मदात्यांसमोरच संपवला लेकीचा जीव )

एका क्षुल्लक वादातून उद्भवलेल्या या घटनेने एक कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे घरमालकांनी आपला भाडेकरू कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, याची पूर्ण माहिती घेऊन आणि पोलीस पडताळणी करूनच घर भाड्याने द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com