जाहिरात

Nagpur News: वसतिगृहातील असुविधांबाबत विद्यार्थिनींची CM कडे तक्रार, अधिकाऱ्यांनी सूट उगवण्यासाठी थेट...

Nagpur News: नागपूरमधील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील सोयी-सुविधांबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या आकांक्षा उके या विद्यार्थिनीला प्रशासनाने वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस बजावली आहे.

Nagpur News: वसतिगृहातील असुविधांबाबत विद्यार्थिनींची CM कडे तक्रार, अधिकाऱ्यांनी सूट उगवण्यासाठी थेट...

नागपूरमधून शासकीय अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही आणि सूडबुद्धीच्या कारभाराचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहातील असुविधांबाबत थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडणाऱ्या आकांक्षा उके या शेतकऱ्याच्या मुलीला सावित्रीबाई फुले वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस प्रशासनाने बजावली आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला गेल्यावर अखेर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी करत संबंधित विद्यार्थिनीला मोठा दिलासा दिला आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातील असलेली विद्यार्थिनी आकांक्षा उके ही नागपूरच्या शासकीय सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहते. नागपूरमधील कडाक्याच्या उन्हाळ्यात वसतीगृहात कुलर्स किंवा पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींचे हाल होत होते. यासाठी आकांक्षाने 4 आणि 8 तारखेला थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या असुविधांची तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची कडक शब्दांत झाडाझडती घेतली आणि त्यांना चांगलेच झापले होते.

(नक्की वाचा-  पुणे पोर्शे अपघात प्रकरणात; अग्रवाल कुटुंबाचा माज कायम! जेलमधून बाहेर आल्यानंतरचा संतापजनक VIDEO व्हायरल)

ट्रेनिंगला दाखवले 'नोकरी' आणि बजावली नोटीस!

मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या या कानउघाडणीचा राग वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी थेट या विद्यार्थिनीवर काढण्यास सुरुवात केली. आकांक्षा केवळ एका ट्रेनिंगचा भाग असताना, ती नोकरदार आहे असे खोटे कारण अधिकाऱ्यांनी पुढे केले. हाच बहाणा करून तिला तातडीने वसतिगृह सोडण्याची अधिकृत नोटीस बजावण्यात आली. या नोटिसीनुसार आकांक्षाला आजच वसतिगृह सोडावे लागणार होते.

Nagpur News

6 महिन्यांचा खर्च वसूल केल्याचा आरोप

प्रशासनाच्या छळाची परिसीमा इथेच थांबली नाही. आकांक्षाकडून गेल्या 6 महिन्यांपासून ती तिथे राहत असल्याचा निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्चही सक्तीने वसूल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला धीर

हा संपूर्ण अन्यायकारक प्रकार समोर आल्यानंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांनी थेट पीडित विद्यार्थिनी आकांक्षा हिच्याशी फोनवर संपर्क साधला आणि तिची विचारपूस केली. "तुला वसतिगृह सोडण्याची अजिबात गरज नाही, सरकार तुझ्या पाठीशी आहे," असा खंबीर धीर पालकमंत्र्यांनी तिला फोनवरून दिला आहे. पालकमंत्र्यांच्या या हस्तक्षेपामुळे आता सुडाचे राजकारण करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com