संजय तिवारी, नागपूर
नागपूरमध्ये एका उच्चशिक्षित महिलेने लग्नालाच व्यवसाय बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या 'लुटेरी दुल्हन'ने किमान आठ जणांना लग्न करून फसवले आणि त्यांच्याकडून लाखोंची रक्कम उकळल्याचा आरोप तिच्यावर आहे. कायद्यातील तरतुदींचा आणि धर्मातील चालीरीतींचा गैरफायदा घेत ती पतींचा छळ करत असल्याचे समोर आले आहे.
ही महिला पेशाने एक शिक्षिका आहे आणि दिसायला सुंदर आहे. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की शादी डॉट कॉम आणि फेसबुकद्वारे श्रीमंत आणि विवाहित तरुणांना लक्ष्य करत असे. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती त्यांना स्वतःची दुःखद कहाणी सांगायची. आपण घटस्फोटीत असून पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे, असे ती त्यांना भासवायची.
(नक्की वाचा- VIDEO: हे वागणं बरं नव्हं! नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं मंत्र्यांसमोर लोटांगण)
त्या तरुणांसोबत गुप्तपणे लग्न करून काही दिवस व्यवस्थित संसार केल्यानंतर, ती पतीसोबत भांडण करायची आणि पोलिसांत तक्रार दाखल करायची. त्यानंतर ती याच तक्रारींचा वापर करून ब्लॅकमेल करत पतींकडून लाखो रुपये उकळायची. तिने एका पतीकडून 50 लाख तर दुसऱ्याकडून 15 लाख रुपये नगद किंवा बँक खात्यातून घेतल्याचा आरोप आहे.
गेली पंधरा वर्षे तिने अशाप्रकारे अनेक तरुणांना फसवले असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिच्यावर नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांत आठ पतींनी तक्रार दाखल केली आहे. कायद्याचा गैरवापर करत ती पतींना त्रास द्यायची आणि त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर करत असल्याचा आरोपही आहे. ती नागपूरमधील गुंड टोळ्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन पतींना मारहाण करायची, असेही काही पतींनी सांगितले आहे.
यावर्षी मे 14 रोजी तिला पहिल्यांदा ताब्यात घेतले असता, तिने स्वतः गरोदर असल्याचे सांगून अटक टाळली आणि फरार झाली होती. अखेर, जुलै 29 रोजी ती डॉली की टपरी या चहाच्या दुकानात नवव्या पतीसोबत चहासाठी आली असताना पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली.
(नक्की वाचा- Heart Attack: जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना)
टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता
या प्रकरणात फक्त ती एकटीच नसून तिची आई, काका, काकू, एक धर्मगुरू आणि एक वकील यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिच्या टोळीतील इतर सदस्यांचा आणि तिने फसवलेल्या इतर लोकांचा शोध सुरु केला आहे. ही घटना एखाद्या क्राइम सिरीजलाही लाजवेल अशी आहे आणि यातील अनेक बाबींचा अजूनही तपास सुरू आहे.