जाहिरात

Crime News: नाशिक हादरलं! विवाहितेचा 2 लाखांत 'सौदा'; इव्हेंटच्या नावाखाली नेलं अन् पुढे भयंकर घडलं

नाशिकच्या एका विवाहितेला इव्हेंटमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने नांदगावमध्ये दोन लाखांना विकण्यात आले. सातपूर पोलिसांनी 300 लोकांच्या जमावाशी दोन हात करून पीडितेची सुटका केली आहे.

Crime News: नाशिक हादरलं! विवाहितेचा 2 लाखांत 'सौदा'; इव्हेंटच्या नावाखाली नेलं अन् पुढे भयंकर घडलं

राहुल वाघ, नाशिक

नाशिकच्या सातपूर परिसरात राहणाऱ्या एका असहाय्य विवाहितेची मानवी तस्करी करून तिची विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पदरात 3-४4 महिन्यांचे तान्हे बाळ असलेल्या या महिलेच्या गरिबीचा फायदा घेत दोन महिला एजंटनी तिला चक्क दोन लाख रुपयांना विकले आणि नांदगावमध्ये तिचे बळजबरीने लग्न लावून दिले.

'इव्हेंट'च्या कामाचे दाखवले आमिष

सातपूरच्या कार्बन नाका परिसरात राहणाऱ्या पीडितेची पतीपासून विभक्त झाल्यामुळे आर्थिक ओढाताण सुरू होती. याचाच फायदा संशयित आरोपी राणी आणि भागी नावाच्या दोन महिलांनी घेतला. "तुला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये चांगले काम मिळवून देतो," असे सांगून 27 फेब्रुवारी रोजी तिला मालेगावमार्गे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेण्यात आले.

(नक्की वाचा- पुण्यात खळबळ! कोट्यवधींच्या 'डिजिटल अरेस्ट' स्कॅममध्ये प्रसिद्ध 'रील स्टार'चा हात; पोलिसांकडून शोध सुरू)

दोन लाखांत विक्री आणि बळजबरीने विवाह

जातेगाव येथे पोहोचल्यावर या महिला एजंटनी नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून दोन लाख रुपये घेतले आणि पीडितेचा तीव्र विरोध असतानाही तिचे बळजबरीने त्याच्याशी लग्न लावून दिले. रात्रभर चाललेल्या या भयानक प्रकारानंतर, 28 फेब्रुवारी रोजी पीडितेने कसाबसा आपल्या आईशी मोबाईलवरून संपर्क साधला आणि आपली आपबिती सांगितली.

300 जणांच्या जमावाचा वेढा तोडून सुटका

पीडितेच्या पालकांनी सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने जातेगावात पोहोचले. पोलिसांना पाहून तिथे सुमारे 300 ग्रामस्थांचा जमाव गोळा झाला आणि त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी धाडस दाखवत या मोठ्या जमावाचा वेढा मोडीत काढला आणि पीडित महिलेची तिच्या बाळासह सुखरूप सुटका केली.

(नक्की वाचा-  Thane News: सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक; ज्युनियर कलाकारांना आमिष दाखवून करत होती फसवणूक)

मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला एजंटना अटक केली असून, एकूण 6 संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. हे सहाही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. "यामागे एखादे मोठे आंतरजिल्हा रॅकेट असण्याची शक्यता असून तपास वेगाने सुरू आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com