Nashik Election: नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच ठिणगी पडली आहे. भाजप आमदार सीमा हिरे यांनी शिवसेना (शिंदे गट) नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "आमच्यासमोर ताकदवान उमेदवार उभे राहू नयेत, म्हणून त्यांनी मतदारयाद्यांमधून उमेदवारांची नावे गायब केली," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
'पोटात गोळा उठलाय'
सोमवारी सायंकाळी गंगापूर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 8 च्या भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सीमा हिरे बोलत होत्या. या वेळी त्यांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली. "आपल्यासमोर प्रबळ उमेदवार उभे राहू नयेत म्हणून त्यांनी नाव गायब करण्याचे षडयंत्र रचले. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. यावरूनच त्यांच्या पोटात किती गोळा उठलाय हे दिसून येते," असे हिरे म्हणाल्या.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
आमदार निधीतून झालेल्या कामांचे श्रेय शिंदे गटाचे नेते स्वतःकडे घेत असल्याचा दावाही त्यांनी केला. "खोटे बोल पण रेटून बोल, ही त्यांची पद्धत आहे," अशी घणाघाती टीका सीमा हिरे यांनी केली.
"नऊ वर्ष आम्ही भोगलंय"
मतदारांना आवाहन करताना सीमा हिरे यांनी मागील निवडणुकीतील अनुभवाचा उल्लेख केला. "मागच्या वेळी चुकून 'धनुष्यबाण' बटन दाबले गेले आणि त्याचे परिणाम आपण नऊ वर्ष भोगले आहेत," असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नऊ वर्षांत त्यांनी काय काम केले, हे ते दाखवू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
(नक्की वाचा- "मुख्यमंत्र्यांनी माझी कदर केली", संतोष धुरींची प्रतिक्रिया; संदीप देशपांडेंसोबतच्या मैत्रीबाबत म्हणाले...)
नाशिक निवडणुकीत तणाव वाढला
आमदार सीमा हिरे यांनी विलास शिंदे यांचे नाव न घेता केलेला हा हल्ला महायुतीमधील समन्वयाचा अभाव दर्शवणारा आहे. मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम शिंदे गटाकडून केले जात असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्टपणे सांगितले. या आरोप-प्रत्यारोपामुळे प्रभाग क्रमांक 8 मधील निवडणूक आता अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world