योगेश शिरसाट, अकोला
Akola News: अकोल्यातील अकोट नगरपरिषदेत सत्तेसाठी झालेली भाजप आणि एमआयएम (MIM) यांची 'विचित्र' युती अखेर अवघ्या काही दिवसांतच संपुष्टात आली आहे. वैचारिक मतभेद आणि सर्वस्तरांतून होणाऱ्या टीकेमुळे एमआयएमने 'अकोट विकास मंच'मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याला अधिकृत मंजुरी दिली आहे.
एमआयएमचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
एमआयएमने अकोट विकास मंचमधून बाहेर पडण्यासाठी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत पत्र दिले होते. या पत्रामध्ये एमआयएमच्या 5 सदस्यांनी आपण युतीतून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्राची दखल घेत एमआयएमला युतीतून बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता ही युती अधिकृतपणे संपुष्टात आली असून, सत्तेचे समीकरण बदलले आहे.
टीकेमुळे घेतला माघार घेण्याचा निर्णय
अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसशी तर अकोटमध्ये एमआयएमशी युती केल्याने राज्यभर भाजपवर टीकेची झोड उठली होती. "सत्ता हवी कशाला, एमआयएम सोबत कशाला?" असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांकडून विचारला जात होता. दुसरीकडे, एमआयएमवरही त्यांच्या मतदारांकडून दबाव होता. या दुहेरी दबावामुळे अखेर एमआयएमने युती तोडणेच पसंत केले.
भाजपसमोर आता नवे आव्हान
अकोट नगरपालिकेत भाजपच्या नगराध्यक्ष माया धुळे निवडून आल्या आहेत, मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला आता नव्या मित्राची गरज आहे. ३५ सदस्यीय सभागृहात भाजपचे ११ सदस्य आहेत. एमआयएम बाहेर पडल्याने आता भाजप सत्ता टिकवण्यासाठी कोणता 'नवा पॅटर्न' राबवणार? उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट की अपक्षांना सोबत घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world