- नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 72 जागा जिंकल्या आहेत
- मनसेचा एकमेव नगरसेवक शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत नव्या राजकीय समीकरणाला चालना दिली आहे
- शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात नाशिकमध्ये युती झाली आहे
महापालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र लढले. नाशिक महापालिका निवडणुकीतही उद्धव आणि राज ठाकरे यांची युती झाली होती. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिंदेंच्या शिवसेनेनं ही चांगली कामगिरी केली. आता नाशिकमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. इथं मनसेचा एकमेव नगरसेवक निवडून आला आहे. त्याने आता शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कल्याण प्रमाणे नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटा बरोबरची युती मनसेने तोडली आहे.
नाशिक महापालिकेत मनसेने शिवसेना शिंदे गटाला दिला पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदेसेना आणि भाजप यांची नाशिकमध्ये युतीची शक्यता आहे. भाजपने सर्वाधिक 72 जागा जिंकल्या आहेत. अशा वेळी शिंदे सेना आणि मनसेच्या आघाडीचं नवं समीकरण समोर आलं आहे. शिवसेना- मनसे आघाडी असं या आघाडीचं नामकरण करण्यात आलं आहे.
मनसेला सोबत घेतल्याने शिंदेसेना आणि मनसे यांचा मिळून एक सदस्य स्थायी समितीवर वाढणार आहे. नाशिक महानगरपालिकेत मनसेचा एकमेव नगरसेवक आता शिंदे सेने सोबत गेला आहे. ठाकरेंना हा मोठा धक्का समजला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढलेले मनसेचे एकमेव नगरसेवक सत्ता स्थापनेपूर्वी शिंदे सोबत गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या नव्या आघाडीमुळे स्थायी समिती,प्रभाग समिती,स्विकृत नगरसेवक आणि पालिकेतील वेगवेगळ्या समितीवर राजकीय समीकरण बदलणार आहे.
नाशिकमध्ये मनसेच्या मयुरी पवार या एकमेव नगरसेविका आहेत. भाजपचे 72 नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 26 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला 15 नगरसेवक आले आहेत. काँग्रेसचे 3 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवली प्रमाणे नाशिकमध्ये ही मनसे आणि शिंदे सेनेची युती झालेली दिसून येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world