राहुल कांबळे, नवी मुंबई
नवी मुंबईत काँग्रेसला विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा धक्का बसला. नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबईत काँग्रेस खिंडार पडल्याची चर्चा सुरु होती. मात्र आज वाशीतील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनिल कौशिक पक्षातून गेल्याबद्दल काँग्रेस भवनबाहेर रस्त्यावर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तर काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी घोषणाबाजी करत कार्यालयाचे टाळे काढून दरवाजे उघडले. भवनात लावण्यात आलेल्या बॅनरवरून अनिल कौशिक यांचा फोटो फाडून फेकला.
(नक्की वाचा- महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 7 दिवसांत केंद्र सरकार पडणार; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा)
यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर युवानेते अनिकेत म्हात्रे यांनी लिंबू मिरची बांधून भवनाची प्रतिकात्मक नजर उतरवली. यावेळी काँग्रेस भवनमध्ये जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्याबाबत निश्चय केला. जमलेल्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करत अनिल कौशिक यांचा खरपूस समाचार घेतला.
(नक्की वाचा- लोकसभेनंतर विधानसभेतही 'सांगली पॅटर्न', मनोज जरांगेंसोबत भेटीगाठी)
निवडणुकीत पक्षाला सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणू असा एकमताने संकल्प केला. काँग्रेस भवनमध्ये झालेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे काँग्रेस पक्षात एक नवी उमेद निर्माण झाली आहे.