
नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये सध्या जवळपास 3 लाख नागरीक राहतात. पण या भागात एकही अधिकृत पेट्रोल पंप कार्यरत नाही. त्यामुळे इथे एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. सिडकोने तीन ठिकाणी पेट्रोल पंपासाठी जागा दिली आहे. पण प्रत्यक्षात इथे एकही पंप सुरू झालेला नाही. परिणामी नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.उलवे परिसरात बामणडोंगरी रेल्वे स्थानक आहे. शिवाय अटल सेतूही याच परिसरातून जातो. त्यामुळे या परिसरात वाहनांची मोठी गर्दी असते. इथली नागरी वसाहती झपाट्याने वाढत असताना पेट्रोल पंपाची सुविधा नसल्यामुळे, स्थानिकांना पेट्रोलसाठी नेरुळ, पनवेल, बेलापूरला जावं लागतंय. पेट्रोल भरण्यापायी इथल्या नागरिकांना बरेच इंधन आणि वेळ खर्च करावा लागतोय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या नागरिक सुविधांच्या अभावातून निर्माण झालेल्या दुर्दशेचं एक टोकाचं उदाहरण म्हणजे, अलीकडे उलवेच्या जावळे गावात घडलेली गॅस सिलेंडर स्फोटाची दुर्घटना. एका किराणा दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. तर घरातील आणखी एक जण गंभीर जखमी झाला होता. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण घर आणि दुकान जळून खाक केलं. प्राथमिक चौकशीनंतर समोर आलं की, दुकानात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या ज्वलनशील पदार्थ साठवण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
उलवे परिसरात अधिकृत पेट्रोल पंप नसल्यामुळे, अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीचं जाळं फोफावलेलं आहे. खासगी गॅरेजमध्ये, किराणा दुकांनांमधून पेट्रोल आणि डिझेलची अवैध विक्री केली जात आहे. इथल्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल साठवलं जातं आणि ते बाटल्यांद्वारे विकलं जातं. ही इंधन विक्री अग्निशमन आणि सुरक्षा नियमांना हरताळ फासणारी असून, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष यामागे ठळकपणे दिसून येते. या सगळ्या पार्श्वभूमीवर, उलवे परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे तत्काळ अधिकृत पेट्रोल पंप सुरू करण्याची आणि बेकायदेशीर विक्री थांबवण्याची मागणी केली आहे. उलवे नोड हा सिडकोचा नियोजित आणि शहरी भाग असूनही, अशा मूलभूत नागरी सुविधा मिळवण्यासाठी स्थानिकांना आंदोलनाचा पवित्रा स्वीकारण्याची वेळ आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - राजाच्या हत्येपूर्वी काय घडलं? सोनमसोबतचा शेवटचा VIDEO आला समोर
एका बाजूला उलवे हे नवी मुंबईच्या स्मार्ट सिटी योजनेचा भाग मानलं जातं. तर दुसऱ्या बाजूला येथे साधा पेट्रोल पंप नसणे, ज्वलनशील पदार्थांचा बेकायदेशीर साठा, अवैध विक्री आणि निर्माण झालेली धोकादायक स्थितीयामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. उलवेची वाढती लोकसंख्या पाहाता, सुरक्षा, सुविधा आणि शाश्वत नियोजन ही वेळेची गरज आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world