- राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai News: नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरलंय. घरातून बाहेर पडावं की पडू नये? असा प्रश्न स्थानिकांसमोर निर्माण झालाय. कारण कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यान परिसरातील एका झाडावर भलामोठा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर स्थानिक संताप व्यक्त करत आहेत.
नेमकी घटना काय?
नेहमीप्रमाणे नागरिक नवी मुंबईतील (Navi Mumbai News) या उद्यानामध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यावेळेस एका झाडावर त्यांना अजगर दिसला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अजगराला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ आणि फोटो काढले. पण नागरी वस्तीत अजगर आढळल्याने स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डम्पिंग ग्राऊंडमुळे सापांचा सुळसुळाट?
परिसरात सापांचा सुळसुळाट होण्यामागील मुख्य कारण डम्पिंग ग्राऊंड असल्याचे नागरिकांचे म्हणणंय. निसर्ग उद्यानाला लागूनच असलेल्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. महापालिकेकडून या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने तिथे घाणीचे साम्राज्य पसरल्याचे स्थानिकांचं म्हणणंय. परिणामी अशा निर्जन आणि अस्वच्छ ठिकाणी साप, अजगर यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाट वाढलाय. हेच प्राणी आता भक्ष्याच्या शोधात उद्याने आणि नागरी वस्त्यांकडे वळत आहेत.
नागरिकांचा संताप आणि मागणी"कोट्यवधी रुपये खर्च करून ही उद्याने उभारली, पण आज त्यांची अवस्था डम्पिंग ग्राऊंडसारखी झाली आहे," असा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक संताप व्यक्त करत आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, परिसर स्वच्छ करावा तसेच सर्पमित्रांच्या मदतीने सापांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
(Trending News: पळाला नाही तर नडला! घनदाट जंगलात 13 वर्षाचा प्रभात 2 अस्वलांना भिडला, 4 मिनिटांचा थरार)
महाकाय अजगराचा व्हिडीओ | Viral Video Huge Python
आयुक्त काय पाऊल उचलणार?
आता या गंभीर प्रकारानंतर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लावणार का? आणि सर्पमित्रांच्या मदतीने या परिसराची सुरक्षितता सुनिश्चित करणार का? याकडे संपूर्ण नवी मुंबईकरांचे (Navi Mumbai News) लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world