Navi Mumbai News: मुंबई आणि उपनगरांसह नवी मुंबई परिसरातही गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा वाढता जोर आणि हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेने आज, 3 जुलै रोजी दुपारच्या सत्रात भरणार्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्याचे निर्देश
पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता केवळ दुपारच्या शाळांना सुट्टी देऊन पालिका प्रशासन थांबलेले नाही, तर सकाळी आणि सर्वसाधारण सत्रात सुरू असलेल्या शाळांसाठीही विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे. ज्या शाळांचे सकाळचे सत्र सुरू आहे, त्यांनी पालकांना तातडीने संपर्क करून परिस्थितीची कल्पना द्यावी. विद्यार्थ्यांना घरी सोडताना केवळ त्यांचे मूळ पालक किंवा त्यांनी पाठवलेले अधिकृत प्रतिनिधी यांच्याकडेच विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे सुपूर्द करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यात किती वाढ? आकडेवारी आली समोर)
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. "शहरातील सद्यस्थिती पाहता सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. पालिकेने दिलेल्या या आदेशाची सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी शाळांनी तात्काळ व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी", असे आदेशही खिल्लारे यांनी दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world