Raigad School Holiday Update : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून रायगड जिल्ह्यातील अलिबाग,पनवेल,उरण, श्रीवर्धन, म्हसळा,तळा आणि पोलादपूर या तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या गुरुवार 2 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी हा आदेश जारी केला आहे.भारतीय हवामान विभागाने 1 ते 5 जुलै या कालावधीत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार,तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.त्यानुसार स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक सस्पेंड, पोलिसी खाक्या दाखवताना कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल
अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली अन्..
गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबईसह रायगड परिसरात मध्यरात्री आणि पहाटे मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा परिणाम आज सकाळी वाहतूक व्यवस्थेवरही झाला. नेरूळ आणि वाशी परिसरात पाणी साचल्यामुळे दोन शाळेच्या बस अडकल्या. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
नक्की वाचा >> Ulhasnagar Rain Video: सगळीकडे पाणीच पाणी, उल्हासनगरच्या गल्ल्यांमध्ये भयावह अवस्था, शेवटी एक आजीबाई..
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान,आदेशानुसार मुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहकार्य करावे,असे स्पष्ट करण्यात आले आहे.सतत सुरू असलेला पाऊस,सखल भागात साचलेले पाणी आणि हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता पालकांनी विद्यार्थ्यांना विनाकारण घराबाहेर न पाठवता प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world