विशाल पाटील, प्रतिनिधी
नवी मुंबईतील ज्येष्ठ भाजपा नेते गणेश नाईक यांनी शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्याबाबत केलेल्या विधानामुळे महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या विषयावर ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाईक यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयांना न जुमानता मित्रपक्षाला संपवण्याची भाषा करणे, हा थेट नेतृत्वावर अविश्वास असल्याचे म्हस्के यांनी पत्रात म्हंटले आहे.
गणेश नाईकांचे शिवसेनेला उघड आव्हान
नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे वक्तव्य केले होते. या विधानामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष जुना असला, तरी आता महायुतीत असतानाही नाईक यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
( नक्की वाचा : Thane News : ठाण्यात भाजपाच्या घोड्याचे लगाम कुणी खेचले? गणेश नाईकांच्या 'त्या' वक्तव्याला केळकरांची साथ! )
नरेश म्हस्के यांचे रविंद्र चव्हाणांना पत्र
नरेश म्हस्के यांनी आपल्या पत्रात गणेश नाईक यांना शिवसेनेच्या जुन्या इतिहासाची आठवण करून दिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळात शिवसेनेने गणेश नाईक यांना कशी धोबीपछाड दिली होती, याचे स्मरण नाईकांनी ठेवावे, असा टोला म्हस्के यांनी लगावला आहे.
तसेच, ज्या एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे राज्यात युतीचे सरकार आले आणि भाजप नेत्यांवरील संकटे दूर झाली, त्यांच्याच पक्षाला संपवण्याची भाषा नाईक कशी करू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. नाईक हे वारंवार मित्रपक्षाबद्दल अशी विधाने करून युती धर्माचे उल्लंघन करत असल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा : Jitendra Awhad : 'कैसा हराया'! जितेंद्र आव्हाडांच्या हातातून मुंब्रा निसटतंय? वाचा का सुरु झालीय चर्चा )
42 जागांचा संदर्भ
नाईक यांनी नवी मुंबईत शिवसेनेच्या 10 जागाही निवडून येणार नाहीत अशी वल्गना केली होती, मात्र शिवसेनेने 42 जागा निवडून आणून त्यांना उत्तर दिले आहे, असे म्हस्के यांनी पत्रात अधोरेखित केले. नाईक यांची ही वक्तव्ये त्यांच्या अस्वस्थतेतून येत असून, त्यांना शिवसेना संपवण्याची अधिकृत परवानगीच देऊन टाकावी, शिवसेना अशा कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहे, अशी आक्रमक भूमिका म्हस्के यांनी घेतली आहे. या पत्रामुळे आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते या वादावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world