देवा राखुंडे, पिंपरी-चिचवड
Ajit Pawar News : अजित पवार आणि शरद पवार यांच्या मनोमिलनाच्या आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. त्यातच आता बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या काकांचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डोरलेवाडी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार स्वत:बद्दल सांगताना काकांविषयी मोजक्या शब्दांत बरंच काही बोलले. 'आज माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय? चांगलं चाललंय. माझ्या आजोबांच्या पुण्याईनं, माझ्या बापाच्या पुण्याईनं, माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं उत्तम चाललंय,' असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ही बाब लक्षात येताच अजित पवारांनी तिथे असलेल्यांना 'वास्तव' सांगितलं.
(नक्की वाचा- पाकिस्तानला घेरण्यासाठी 7 शिष्टमंडळे तयार; जगाला दहशतवादाविरुद्ध भारत कठोर संदेश देणार)
'आहे ते आहे ना. त्यात काय घाबरायचं? खरं आहे ते खरं आहे. पहिल्यांदा तुम्ही साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून मला निवडून दिलं, खासदार केलं. काय अजित पवारांचं काम बघून केलं नव्हतं. नंतर त्याला त्याचं काम दाखवावं लागलं,' अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा झालेला श्रीगणेशा, त्यांना पहिल्यांदा मिळालेली संधी याबद्दल मोजक्या शब्दांत सांगितलं.
(नक्की वाचा- NIA मोठी कारवाई, पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक)
बारामतीमधील छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अजित पवारांनी सुरुवातीला पृथ्वीराज जाचक यांचं कौतुक केलं. 'तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. ज्याला स्वत:चा प्रपंच करता येत नाही, तो 22 हजार 800 सदस्यांचा प्रपंच करु शकत नाही. इथे प्रमुख कोण आहेत? एक आहेत पृथ्वीराज जाचक. त्यांचा प्रपंच चांगला आहे. त्यांचा धंदा चांगला आहे. कालच मी त्यांच्या भागात गेलो होतो. त्यांचं काम पाहिलं. त्यांची शेती उत्तम आहे. फळबागा उत्तम आहेत. स्वच्छता चांगली आहे. व्यवसाय एकदम चोख आहे. व्यवहार चोख आहे. कोणी माई का लाल आहे का? ज्यानं सांगावं बापूंनी आमचे पैसे बुडवलेत. कुणी असेल तर आता राजकारण सोडून देईन आणि निघून जाईन. आहे का कोणी माई का लाल?' असा सवाल अजित पवारांनी विचारला.