
अभिषेक मुठाळ, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे, तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही, असं ठाम मत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणे गरजेचे आहे. जे कां रंजले गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ असा उपदेश देणार तुकाराम महाराज असतील किंवा अवघे विश्वची माझे घर, असं शिकविणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी' असे शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे यांची शिकवण मुलांना दिली गेली पाहिजे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
(नक्की वाचा- शरद पवारांना धक्का, 'लेडी जेम्स बॉन्ड' सोनिया दुहान NCP अजित पवार गटाच्या वाटेवर, धीरज शर्मांचा प्रवेश)
लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार हा नारा दिल्यानंतर देशांमध्ये संविधान बदलले जाणार, असा प्रचार विरोधकांनी केला. त्यामुळेच अनेक ठिकाणी दलित वर्ग नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. ही चर्चा कुठे शांत होत नाही तर लगेच मनुस्मृतीच्या चर्चा सुरू व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात याचा देखील फटका आपल्याला बसू शकतो याचा विचार आपण करायला हवा, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- प्रफुल पटेलांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर; राष्ट्रवादीकडून 3 नावांची चर्चा)
विधानसभेला 80-90 जागा मिळायला हव्यात- भुजबळ
लोकसभा निवडणुकीत 2019 ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपाने शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा. आम्हाला एवढ्या जागा हव्यात हे त्यांना सांगावे लागेल. जर 80-90 जागा मिळाल्या तर 50-60 निवडून येतील. आता 50 आहेत म्हणजे आम्ही 50 जागा घेऊ असे होणार नाही. आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world