'सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री', बारामतीतील बॅनरची राज्यभर चर्चा

सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचाही बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे.  हे दोन्ही बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins

देवा राखुंडे, बारामती

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे बारामतीत भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. बारामती शहरातील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात ही बॅनरबाजी करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचाही बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे.  हे दोन्ही बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. युगेंद्र पवार यांचा भला मोठा फोटो या बॅनरवर छापण्यात आला असून 'फिक्स आमदार' असं या बॅनरवर लिहण्यात आलं आहे. या बॅनरबाजीतून एकप्रकारे अजित पवारांना आव्हान देण्यात आल्याची चर्चा आता बारामतीत रंगू लागली आहे. 

(नक्की वाचा-  सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांच्या मनात काय?)

supriya Sule

मला महाराष्ट्राचे सरकार बदलायचं आहे असा निर्धार शरद पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महायुतीला आव्हान दिले आहे. जर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात आहे. सुप्रिया सुळे यांनी राज्याचे नेतृत्व करावं अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून असून त्याच अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण ? याबाबत शिक्कामोर्तब झालेलं नाही. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच चेहरा मुख्यमंत्रिपदी बसेल असा दावा केला आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात, असाही अंदाज बांधला जात आहे.

( नक्की वाचा : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आता नवी तारीख, हायकोर्टाकडून विनंती मान्य )

काका विरुद्ध पुतण्या? 

बारामती विधानसभेतून काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होईल, असं सध्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार हे शरदचंद्र पवार पक्षाकडून मैदानात उतरतील आणि थेट अजित पवारांना आव्हान देतील, असं अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होईल.

युगेंद्र पवार अॅक्टिव्ह मोडवर

गेल्या काही दिवसापासून युगेंद्र पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. युवकांची फळी उभी करत त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विजयात योगदान दिले. तेव्हापासून तरुणांमधून आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे अशी मागणी पुढे आली. सध्या बारामतीत युगेंद्र पवारांचं वारं वाहू लागलं आहे. अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडल्यानंतर युगेंद्र पवारांनी बारामतीत स्वाभिमानी यात्रा काढली. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन ते बारामती तालुका पिंजून काढत आहेत. युगेंद्र पवारच बारामतीत पवार गटाचे संभाव्य उमेदवार असतील असे संकेत खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्याने त्यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Topics mentioned in this article