रेवती हिंगवे, पुणे
Pune News: पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याच्या मृत्यून खळबळ उडाली आहे. पोहण्याचा सराव करत असताना या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आदित्य यादव (वय 18) असे मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोहण्याचा सराव करत असताना त्याचा मृत्यू झाला. दोन आठवड्यात एनडीएमध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे, ज्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एनडीएने दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना पोहण्यामध्ये अधिक प्रशिक्षणाची गरज होती, अशा विद्यार्थ्यांचा सराव प्रशिक्षकांसमोर सुरु होता. आदित्य यादव स्विमिंग पूलमध्ये असताना अचानक बेशुद्ध झाला आणि त्याची हालचाल थांबली. तिथे उपस्थित असलेल्या लाईफगार्ड्सनी त्याला लगेच बाहेर काढून सीपीआर दिला, परंतु त्याचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
याबाबत स्थानिक पोलिसांना आणि विद्यार्थ्याच्या पालकांना कळवण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे. आदित्यचा जीव कशामुळे गेला? तो अचानक बेशुद्ध कसा पडला, याबाबतची सखोल तपासणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आठवडाभरापूर्वी एकाचा मृत्यू
यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी, एनडीएमधीलच अंतरिक्ष कुमार या 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता आदित्य यादवच्या मृत्यूमुळे कॅम्पसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकामागोमाग घडलेल्या या दोन घटनांमुळे एनडीए प्रशासनावर अधिक दबाव आला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस या दोन्ही घटनांचा गांभीर्याने तपास करत असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.