जाहिरात

Palghar Rain: पालघरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

Palghar News: पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून वेगवेगळ्या दोन दुर्घटनांमध्ये दोघांचा दुर्दैवी बळी गेला आहे. पालघर नगर परिषद हद्दीत घराची भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे

Palghar Rain: पालघरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

मागील दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या या रुद्र रूपामुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या असून यामध्ये दोघांना आपला जीव गमावावा लागला आहे. पालघर शहरातील आगरी पाडा भागात भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर डहाणू तालुक्यात सूर्या नदीच्या जोरदार प्रवाहात मासेमारीसाठी गेलेला शेतकरी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

पालघर नगर परिषद हद्दीतील आगरी पाडा परिसरात राहणाऱ्या राबिया शब्बीर सय्यद या आपल्या घराबाहेर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करत होत्या. पाणी साचल्यामुळे शेजारील एका जीर्ण घराची भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात राबिया या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या.

परिसरातील नागरिकांनी मोठ्या शर्थीने त्यांना ढिगाऱ्याखालून काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे शहरातील जीर्ण आणि धोकादायक घरांचा व इमारतींचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डहाणूमध्ये सूर्या नदीत शेतकरी वाहून गेला

मुसळधार पावसाचा दुसरा बळी डहाणू तालुक्यात गेला आहे. पेठ केदारपाडा येथील विठ्ठल जान्या केदार हे शेतकरी नेहमीप्रमाणे सूर्या नदीत मासेमारी करण्यासाठी उतरले होते. दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे सूर्या नदीला पूर आला असून पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता.

नदीपात्रातील पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने विठ्ठल केदार हे पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली असून पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पालघर जिल्ह्याला 'रेड अलर्ट'

हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट  जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असून सखल भागात पाणी साचले आहे. पुढील दोन दिवसही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com