पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर वाढला असून भारतीय हवामान खात्याने (IMD) जिल्ह्यात अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार करून पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी आज, गुरुवार 23 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणकोणत्या संस्थांना लागू असेल सुट्टी?
- सर्व अंगणवाड्या
- शासकीय व सर्व खासगी शाळा (प्राथमिक व माध्यमिक)
- आश्रमशाळा
- सर्व महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्था
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्देश
विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी आपत्ती व्यवस्थापनाचे काम सुरळीत राहावे यासाठी शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- Ketan Agrawal Case: केतनचा जीव वाचला असता; सिया आणि चेतनने पोलिसांना सांगितला 'प्लॅन A')
डहाणू-तलासरीत पूरस्थिती
डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील झाई गावातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, तर कासा गावात नाल्याला पूर आल्याने गायकवाड पाड्यातील एक कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी घरे कोसळल्याच्या घटनाही घडल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, झाई–बोर्डी मार्गावर रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास समुद्रकिनारी असलेल्या गावांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
पालघर जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे नद्या, नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी, धबधबे किंवा नदीपात्राजवळ जाणे टाळावे. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world