जाहिरात

Palghar News: दारूची नशा आणि रीलची क्रेझ! काळमांडवी धबधब्यावर तरुणासोबत घडलेल्या दुर्घटनेने पालघर हादरले

Palghar News: पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील काळमांडवी धबधब्यावर रील बनवण्याच्या नादात एका तरुणासोबत भयंकर घडले आहे. नेमकी काय आहे घटना, वाचा सविस्तर माहिती...

Palghar News: दारूची नशा आणि रीलची क्रेझ! काळमांडवी धबधब्यावर तरुणासोबत घडलेल्या दुर्घटनेने पालघर हादरले
"Palghar News: पालघरमधील काळमांडवी धबधब्यावर तरुणासोबत भयंकर घडलं"
NDTV Marathi

- मनोज सातवी, प्रतिनिधी

Palghar News: सोशल मीडियावरील रीलच्या वाढत्या क्रेझमुळे पुन्हा एकदा एका तरुण पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला आहे. पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या काळमांडवी धबधब्यावर रील बनवण्याच्या नादात 17-18 वर्षीय नयन कुमार सिंग या तरुणाचा डोहात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मद्यधुंद अवस्थेत होता तरुण?

मिळालेल्या माहितीनुसार, नयन कुमार हा त्याच्या दोन मित्रांसह काळमांडवी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आला होता. सोशल मीडियावरील या धबधब्याचे आकर्षक रील पाहून तो पर्यटनासाठी आकर्षित झाला होता. दुपारी धबधब्यावर पोहोचल्यानंतर काही वेळातच रील बनवण्याच्या प्रयत्नात असताना नयनचा तोल गेला आणि तो खोल डोहात बुडाला. त्याच्या मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम राबवून त्याला बाहेर काढले, पण जव्हार येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

गाईड्स समितीचा खळबळजनक आरोप

या दुर्घटनेनंतर स्थानिक गाईड्स समितीने धक्कादायक आरोप केला आहे. नयन हा दारूच्या नशेत होता आणि त्याच अवस्थेत रील बनवत असताना ही दुर्घटना घडल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच पर्यटकांच्या बेफिकीर वागण्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

(नक्की वाचा: Palghar News: पालघरकरांनो सावधान! केळवे रोडवर रात्रीस खेळ चाले, ज्वेलर्स मालकाचा लाखोंचा ऐवज लुटला, परिसरात दहशत)

पोलीस बंदोबस्ताची मागणी

वीकेंडला काळमांडवी धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. पण एवढ्या मोठ्या पर्यटनस्थळी सुरक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी गर्दीच्या वेळी येथे कडक पोलीस तैनात करण्याची मागणी जोर धरत आहे. मृत पावलेला नयन कुमार हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

धोकादायक ठिकाणी रील बनवताना स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com