- सचिन तेंडुलकर यांनी पालघर जिल्ह्यातील गुहिर गावाला क्लायमेट स्मार्ट व्हिलेज प्रकल्प सुरू केला आहे
- गावात सौर ऊर्जा वापर वाढवणे,शेतीस प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे यावर भर दिला आहे
- सचिन तेंडुलकर फाउंडेशन, श्नायडर इलेक्ट्रिक इंडिया आणि स्प्रेडिंग हॅपिनेस इन दिया फाउंडेशन यांनी काम केले आहे
मनोज सातवी
मैदानावर आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडणाऱ्या सचिन तेंडुलकरने आता पालघरच्या दुर्गम भागात विकासाची नवी इनिंग सुरू केली आहे. वाडा तालुक्यातील गुहिर गाव आता सौर ऊर्जेने उजळणार असून ते 'क्लायमेट स्मार्ट व्हिलेज' म्हणून ओळखले जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन सचिनच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी मास्टर ब्लास्टरला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. हवामान बदलाचे संकट उभे ठाकलेले असताना ग्रामीण भागाला सौर ऊर्जा आणि आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यासाठी सचिनने पुढाकार घेतला आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गुहिर गावाला 'क्लायमेट स्मार्ट व्हिलेज' म्हणून विकसित करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सचिनच्या हस्ते करण्यात आला. "आम्ही पहिली इनिंग खेळलो आहोत, आता ग्रामस्थांनी जबाबदारीची दुसरी इनिंग खेळावी," असे आवाहन यावेळी सचिन तेंडुलकर यांनी केले. सचिन तेंडुलकर फाउंडेशन, श्नायडर इलेक्ट्रिक इंडिया आणि 'स्प्रेडिंग हॅपिनेस इन दिया फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत गावात सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे यावर भर दिला जाणार आहे.
केवळ सोयी-सुविधा पुरवणे हा उद्देश नसून, पर्यावरणाचे रक्षण करत प्रगती साधणे हे या प्रकल्पाचे मुख्य सूत्र आहे. कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर आणि श्नायडर इलेक्ट्रिकचे सीईओ दीपक शर्मा उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन म्हणाला की, गुहिर गावातील हा बदल केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायाने संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरेल. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि पर्यावरणाचे संतुलनही राखले जाईल.
या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांना सौर पॅनेल आणि इतर जीवनावश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. "आम्ही सोयी उपलब्ध करून देऊन आमची पहिली इनिंग पूर्ण केली आहे, पण या सुविधांची देखभाल करणे आणि गावाचा विकास करणे ही दुसरी इनिंग आता गावकऱ्यांच्या हातात आहे," अशा शब्दांत सचिनने स्थानिकांना प्रोत्साहन दिले. या प्रकल्पामुळे शेतीला आधुनिकतेची जोड मिळेल आणि वीजटंचाईचा प्रश्नही सुटेल. स्वच्छ ऊर्जा आणि ग्रामीण विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, गुहिर गावाचा हा कायापालट येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास तेंडुलकरने व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world