जाहिरात

मुंबईजवळच्या जिल्ह्यात या मोसमातील आठवा रेड अलर्ट जाहीर, बुधवारीही शाळेला सुट्टी देण्याची प्रशासनाची घोषणा

Palghar Rain Red Alert: सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईजवळच्या जिल्ह्यात या मोसमातील आठवा रेड अलर्ट जाहीर, बुधवारीही शाळेला सुट्टी देण्याची प्रशासनाची घोषणा
पालघर:

Palghar Rain Red Alert: पालघर जिल्ह्यावर पावसाचे संकट अधिक गडद झाले असून, यंदाच्या पावसाळ्यातील विक्रमी रेड अलर्टची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पालघरसाठी आणखी एक 'रेड अलर्ट' जारी केला असून, पालघर जिल्ह्याला एकाच मोसमात तब्बल 8 दिवस रेड अलर्ट देण्यात आले आहेत.  या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे.

सर्व शाळांना पुन्हा सुट्टी जाहीर

सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 8 जुलै 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तसेच सर्व खासगी आणि अनुदानित शाळा पूर्णपणे बंद राहतील. जिल्ह्यात यापूर्वी 2 जुलै, 4, 5, 6 आणि 7 जुलै रोजी देखील रेड अलर्ट होता. आता सलगच्या या सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )

त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह चार तालुक्यांमध्येही शाळा बंद

पावसाचा जोर केवळ पालघरपुरता मर्यादित नसून शेजारील भागातही याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या भागातील प्राथमिक शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात मदत करण्यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

पर्यटन स्थळांवर 13 जुलैपर्यंत संपूर्ण बंदी

पावसाचा हाहाकार लक्षात घेता प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर 13 जुलै पर्यंत पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः घाट रस्ते, धबधबे आणि गड-किल्ले परिसरात नागरिकांनी तसेच पर्यटकांनी अजिबात जाऊ नये, अशा कडक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com