Palghar News: पालघर जिल्ह्यातील सातपाटी, मुरबे आणि नवापूर खाडी परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांत एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक चित्र समोर आले आहे. या भागांतील किनाऱ्यांवर लाखो मेलेले मासे वाहून आल्याने माशांचा मोठा खच पडला आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार बांधव आणि किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (Tarapur MIDC) कारखान्यांमधून समुद्रात सोडण्यात येणाऱ्या घातक आणि प्रक्रिया न केलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळेच हा प्रकार घडल्याचा थेट आरोप आता स्थानिक मच्छीमार संस्थांनी केला आहे.
मत्स्यसंपत्ती धोक्यात; शास्त्रीय अभ्यासाची मागणी
या सागरी आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, मच्छीमारांची अग्रगण्य संस्था असलेल्या 'धी सातपाटी फिशरमेन्स सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड'ने अत्यंत आक्रमक आणि ठोस पाऊल उचलले आहे. सागरी जीवसृष्टी आणि मत्स्यसंपत्तीवर होणाऱ्या या घातक परिणामांचे सत्य समोर आणण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
(नक्की वाचा- Mumbai Monsoon: मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! पुढच्या आठवड्यात मुंबईत मान्सूनचे आगमन)
केंद्रीय संस्थेकडून तपासणीची मागणी
या संपूर्ण प्रकाराचा आणि दूषित पाण्याचा सागरी जीवांवर काय परिणाम होत आहे, याचा तातडीने 'सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट' (CMFRI) या नामांकित केंद्रीय संस्थेमार्फत सखोल शास्त्रीय अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी संस्थेने केली आहे.
पर्यावरण मंत्र्यांना पत्र
याबाबत अधिकृत माहिती देऊन उपाययोजना करण्यासाठी संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांना एक सविस्तर पत्र पाठवून साकडे घालण्यात आले आहे. शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करून दोषी कारखान्यांवर कारवाई करावी, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
तारापूर एमआयडीसीच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या अनेकदा फुटतात किंवा काही कारखाने चोरट्या मार्गाने रात्रीच्या वेळी थेट रासायनिक पाणी समुद्रात सोडतात, अशा तक्रारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. आता थेट पर्यावरण मंत्र्यांकडेच तक्रार केल्याने शासन यावर काय ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world