ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Badlapur News : जोधपूर एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोंधळामुळे त्यातील प्रवाशांसह लोकल प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी रात्री बदलापूर स्थानकात मोठा गोंधळ झाला. ऐरवी २० ते २५ मिनिटं उशीराने येणारी लोकल तब्बल दीड तास उशीराने स्थानकात दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांकडून रेल्वेवर ताशेरे ओढण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व गोंधळ सुरू असताना रेल्वेकडून कोणतीही उद्घोषणा करण्यात आली नाही.
बदलापूर स्थानकात नेमकं काय घडलं?
जोधपूर एक्सप्रेसमध्ये काही प्रवाशांच्या सामानाची चोरी झाली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप होता. त्यातच एक्सप्रेसमध्ये अनधिकृत प्रवासी शिरल्याने स्वच्छतागृहाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला होता. इतकच नव्हे तर ट्रेनमधील शौचालयाचे दरवाजे देखील लॉक असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. वारंवार रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून देखील योग्य उत्तर प्रवाशांना मिळाले नाही. या सर्व घटनांमुळे संतापलेल्या प्रवाशांनी बदलापूर स्थानकाजवळ येताच एक्सप्रेस थांबवली. प्रवाशांनी बदलापूर स्थानक येताच एक्सप्रेसची चेन खेचली आणि एक्सप्रेस थांबवून फलाटावर उतरून आंदोलन केलं. यामुळे अर्धा ते पाऊण तास एक्सप्रेस रखडली याचा फटका रात्रीच्या खोपोली, अंबरनाथ, बदलापूर लोकलला बसला.
नक्की वाचा - Thane News: कळव्यात राडा! अनधिकृत फेरीवाल्यांकडून जीआरपी, आरपीएफ कर्मचाऱ्यांना मारहाण
बदलापूर अन् पुढील स्थानकावरील नागरिक रखडले...
जोधपूर एक्सप्रेस बदलापूर स्थानकात उभी असल्याने मुंबईहून येणारी खोपोली, अंबरनाथ एक्सप्रेस रखडल्या. घाटकोपरवरून रात्री ११.०३ ची खोपोली फास्ट लोकल मध्यरात्री १२.१६ वाजता पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र हीच लोकल २.१५ वाजता पोचली. याच प्रमाणे मागून येणारी अंबरनाथ, बदलापूर आणि शेवटची खोपोली लोकल देखील प्रचंड रखडली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
