सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड जवळील चिखली येथील पूर्णानगर भागात एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे. आपल्या आईला नोकरीवरून काढून टाकल्याचा आणि पगार न वाढवल्याचा राग मनात धरून एका कामगाराने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हा कट रचला होता. या प्रकरणी चिखली पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
टाटा कंपनीच्या गेटवरून फिल्मी स्टाईलने अपहरण
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विन्सेंट जोसेफ डिसील्वा असे अपहरण झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव आहे. डिसील्वा हे पूर्णानगर येथील टाटा कंपनीच्या मटेरियल गेटजवळून जात असताना, दोन दुचाकींवरून आलेल्या चार तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला. डिसील्वा यांना काही समजण्याच्या आतच, आरोपींनी त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिथून पळ काढला.
(नक्की वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला 'शिंग्रोबा' यांचे नाव द्या! मुख्यमंत्र्यांकडे थेट पत्राद्वारे)
खोलीत कोंडून बेदम मारहाण
अधिकाऱ्याला पळवून नेल्यानंतर आरोपींनी त्यांना नेहरू नगर परिसरातील एका पडक्या खोलीत डांबून ठेवले. तिथे मुख्य आरोपीने डिसील्वा यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. "माझ्या आईला कंपनीने कामावरून का काढले? तिला तातडीने पुन्हा कामावर घ्या आणि माझाही पगार वाढवा," अशी खंड आरोपी डिसील्वा यांना देत होता. पगार वाढवला आणि आईला कामावर घेतले तरच सोडू, अशी तंबीच आरोपींनी दिली होती.
चारही आरोपी गजाआड
या गंभीर घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेहरू नगर येथील त्या घरावर छापा टाकला आणि विन्सेंट डिसील्वा यांची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत शांताराम तयप्पा शिंदे, साहिल संदीप घाडगे, कृष्णा अनंत काळे, पियुष मधुकर शेंडगे या आरोपींना अटक केली आहे. चिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत .
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world