Plalghar News: डहाणू तालुक्यातील गंजाड अंतर्गत आंबेसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माणिक सांगळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. एसीबीने त्यांना 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. शासकीय कामाचे बिल काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणे या डॉक्टरला महागात पडले असून, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
नक्की प्रकरण काय आहे?
तक्रारदार व्यक्ती आरोग्य केंद्रांतर्गत भाडेतत्त्वावर गाड्या पुरवण्याचे काम करतात. या गाड्यांचे थकीत बिल काढून देण्यासाठी डॉ. विजय सांगळे यांनी लाचेची मागणी केली होती. डॉ. सांगळे यांनी एकूण 1 लाख 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेचा पहिला हप्ता म्हणून 35 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याबाबत पालघर एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार विभागाने सापळा रचला आणि ३५ हजार रुपये घेताना डॉक्टरांना रंगेहात बेड्या ठोकल्या.
(नक्की वाचा- CCTV Footage: सोनं-चांदी, पैसे अन् सिलिंडरही चोरला! मध्य प्रदेशातील चोरीच्या घटनेची देशभर चर्चा)
पोलीस कारवाई आणि तपास
भरारी पथकाचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सांगळे यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा- ZP Election 2026: संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा; भाजपच्या खेळीनेही धाकधूक वाढली)
भ्रष्टाचार रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन
सरकारी कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास, नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.