शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप दुसरे तिसरे कोणी नाही तर त्यांच्याच सुनेने केले आहेत. राऊत कुटुंबाने आपल्यावर जादू टोणा केल्याचा गिरीजा राऊत यांचा आरोप आहे. गिरीजा राऊत या विनायक राऊत यांच्या सूनबाई आहेत. नगरसेवक गितेश राऊत यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांना आपल्या मानसिक आणि कौटुंबिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय आपल्यावर जादूटोणा केला जात असल्याचा त्यांनी दावा केला आहे. या प्रकरणी त्यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे.
ही तक्रार दाखल केल्यामुळे ठाकरे गटाचे नेते असलेले माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आपल्या विरोधात घरात अघोरी प्रकार केल्याचा गिरीजा यांचा आरोप आहे. घरात भोंदू बाबांना बोलवून आपल्या डोक्यावरचे केस काढण्यात आले. शिवाय जबरदस्तीने गोमुत्र ही प्यायला दिले असा आरोप गिरीजा यांनी केला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा विनायक राऊत, त्यांची पत्नी शामल, गितेश राऊत, आबा राऊत, हरिश्चंद्र राऊत आणि जादूटोणा करणारा मांत्रिक काजी आबा आणि फिरोज बाबा यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊतांनी स्वत: ही तक्रार दिली असून गुन्हा ही दाखल केला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा आता दाखल झाला आहे. संपूर्ण राऊत कुटुंबावर गिरीजा यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे संपूर्ण राऊत कुटुंबच संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. त्यांच्या विरोधात आता काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे. मात्र राऊत यांच्या अडचणी वाढल्या हे मात्र नक्की आहे.
विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. त्यात सध्या ठाकरे गटाचे अनेक खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. अजून काही जण शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यात आता थेट राऊत यांच्यावरच आरोप झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊत कुटुंबाकडून कोणती ही प्रतिक्रीया आलेली नाही. त्यामुळे राऊत आणि त्याचा मुलगा गितेश याबाबत काय प्रतिक्रीया देतात याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world