BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत रणधुमाळी सुरू आहे, या रणधुमाळीच माजी मंत्री आणि शिवसेना(उबाठा)आमदार आदित्य ठाकरेंनी प्रदूषणाचा मुद्दा हाती घेतला आहे. प्रदूषणावरून टीका करत असताना त्यांनी सोशल मिडिया पोस्टमधून 'मुंबई क्लायमेट वीक 2026' (MCW) वर टीका्त्र सोडले आहे. 'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेने पुढाकार घेऊन ही मोहीम सुरू केली आहे. फेब्रुवारी महिन्यात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरून या उपक्रमाच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. या राजकीय वादात 'मुंबई क्लायमेट वीक' नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
मुंबई क्लायमेट वीकवर आदित्य ठाकरेंचा आक्षेप का आहे?
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत या उपक्रमाला केवळ 'इव्हेंटबाजी' म्हणून हिणवलं आहे. जेव्हा शहरात झाडे कापली जात आहेत आणि कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांवरून पर्यावरणप्रेमी आक्रमक आहेत, तेव्हा अशा परिषदा कशासाठी? असा त्यांचा सवाल आहे. पण दुसरीकडे, 'मुंबई क्लायमेट वीक'कडे पाहिलं तर ही देशातली पहिली अशी 'लोकचळवळ' असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यात सरकार, बीएमसी आणि जागतिक स्तरावरचे तज्ज्ञ एकत्र येणार आहेत. ही केवळ एसी रूममधली चर्चा नसून, ती रस्त्यावरच्या सामान्य माणसाशी जोडण्याचा प्रयत्न आहे.
(नक्की वाचा : BMC Election 2026 : मतदानाच्या दिवशी बँका सुरु की बंद? खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार का? वाचा सर्व माहिती )
'मुंबई क्लायमेट वीक' कधी आहे?
मुंबईला दरवर्षी बसणारा पुराचा फटका आणि गेल्या काही वर्षांत वाढलेली भीषण उष्णता, यावर काहीतरी ठोस उपाय करण्याची गरज अनेकदा बोलून दाखवली जाते. 'मुंबई क्लायमेट वीक'मध्ये नेमका याच गोष्टींवर भर दिला जाणार आहे. 'हब-अँड-स्पोक' मॉडेलनुसार, जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये धोरणांवर चर्चा होईल, सोबतच प्रत्येक वॉर्डमध्ये, महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेतल्या जातील. यात तरुणांना आणि महिलांना मोठं व्यासपीठ मिळेल असा दावा करण्यात आला आहे. या उपक्रमात नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा सहभाग असल्याने, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्टार्टअप्सना मोठं पाठबळ मिळू शकतं. 17 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world