जाहिरात

Akola MPSC Result : वडिलांचं निधन, गंभीर आजारपण तरीही पहिली; प्रगतीसाठी अकोल्यात पुन्हा दिवाळी

प्रगतीचे वडील सुनील जगताप यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं होतं. तरीही प्रगती हताश झाली नाही. ‘प्रगती’कडे वाटचाल सुरू ठेवली.

Akola MPSC Result : वडिलांचं निधन, गंभीर आजारपण तरीही पहिली;  प्रगतीसाठी अकोल्यात पुन्हा दिवाळी

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola MPSC Result : अकोल्यातील प्रगती जगताप ही जिद्द आणि चिकाटीचं जिवंत उदाहरण ठरली आहे. वडिलांचं निधन, आजारपण आणि नैराश्य अशा कठीण परिस्थितीवर मात करत तिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या राज्यसेवा २०२४ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात प्रगतीने उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण राज्यात आपला ठसा उमटवला. दरम्यान महाराष्ट्रातील राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात अकोल्याची 'प्रगती' ही पहिली आली आहे.

प्रतिकूल परिस्थिती, वडिलांचे निधन आणि गंभीर आजारपण अशा कठीण काळातून बाहेर पडून तिने मिळवलेले हे यश आता संपूर्ण विदर्भात कौतुकाचा विषय ठरत आहे. राज्यसेवेची मुख्य परीक्षा २७ ते २९ मे २०२४ दरम्यान झाली होती. पात्र ठरलेल्या १५१६ उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत पार पडल्या आणि निकालात प्रगतीचं नाव राज्यात अव्वल ठरलं. (Akola Inspirational Story)

प्रगतीचे वडील सुनील जगताप यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं होतं. तरीही प्रगती हताश झाली नाही. ‘प्रगती'कडे वाटचाल सुरू ठेवली. तिच्या या यशाची सर्वत्र चर्चा होत असून, अकोल्यातून पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली आहे.

वडिलांचं निधन आणि प्रगतीचा पुनर्जन्म..

प्रगतीचे वडील सुनील जगताप हे अकोला महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक होते. मात्र, ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचं अचानक निधन झालं. त्याच काळात प्रगती गंभीर आजाराने त्रस्त होती. डिसेंबर महिन्यात ती आयसीयूमध्ये दाखल झाली होती. “त्या काळात मी पूर्णपणे खचून गेले होते, पण कुटुंब आणि मित्रांच्या आधारामुळे पुन्हा उभारी घेतली,” असं प्रगती सांगते. “आज बाबांना माझं यश पाहता आलं नाही, हीच मनातली खंत आहे,” ती भावुक होत म्हणाली. पण हाच दुःख तिच्या जिद्दीचं बळ ठरलं आणि त्यातूनच ‘प्रगतीची प्रगती' घडली.

Akola News : पुण्यात एकच डबा वाटून खाल्ला, मामा-भाच्याने MPSC च्या परीक्षेत केली कमाल, जिल्हाभर होतंय कौतुक

नक्की वाचा - Akola News : पुण्यात एकच डबा वाटून खाल्ला, मामा-भाच्याने MPSC च्या परीक्षेत केली कमाल, जिल्हाभर होतंय कौतुक

नोकरी अन् अभ्यास एकत्र, शिकवणीही नाही; फक्त स्वतःवर विश्वास!

२०१६ मध्ये विज्ञान शाखेतून कृषी पदवी घेतल्यानंतर प्रगतीने थेट स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. २०१८ मध्ये कृषीसेवक म्हणून नोकरीला लागूनही तिने अभ्यास सुरू ठेवला. वर्ग-२ संवर्गात २०२२ मध्ये साहाय्यक गटविकास अधिकारी बनल्यानंतरही तिच्या मेहनतीत कमी आली नाही. दररोज ६ ते ८ तास अभ्यास, ‘सेल्फ अॅनालिसिस' आणि फोटोग्राफीचा छंद, या संतुलनातून तिने यशाची वीट रचली. “प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा अभ्यास कसा करावा हे ओळखणं फार गरजेचं आहे,” असा संदेश ती देत आहे.

यूपीएससीचा ध्यास कायम आणि ग्रामीण भारतासाठी प्रेरणा..

राज्यसेवा परीक्षेत पहिला क्रमांक मिळवूनही प्रगती इथे थांबलेली नाही. ती आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) तयारीला लागली आहे. “हे यश मला उभं राहायला शिकवलं, पण अजून मोठं स्वप्न बाकी आहे,” ती म्हणते. तिचं हे यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जसं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं  “तुम्ही शासनकर्ती जमात व्हा आणि ते तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा.” आज प्रगती आणि पातूरच्या  मामा-भाच्यांसारख्या तरुणांनी हे वचन खरं ठरवलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com