जाहिरात

Prakash Ambedkar : काँग्रेसचा जुना खेळ सुरूच; प्रकाश आंबेडकरांचा महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धमाका

Prakash Ambedkar on Congress : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

Prakash Ambedkar : काँग्रेसचा जुना खेळ सुरूच; प्रकाश आंबेडकरांचा महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धमाका
मुंबई:

Prakash Ambedkar on Congress : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या रणधुमाळीत  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसने आपला जुना खेळ पुन्हा सुरू केला असून ते लोकांमध्ये जे बोलतात, त्याच्या अगदी उलट वागतात अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी कोणाकडेही युतीसाठी गेली नसून इतर पक्षच आमच्याकडे आले आहेत, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे.

स्थानिक पातळीवरील युतीचे समीकरण

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना हे सर्व पक्ष स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी वंचितच्या लोकांकडे आले होते. यावर तोडगा म्हणून वंचित बहुजन आघाडीने स्थानिक पातळीवर युती करण्याचे सर्व अधिकार आपल्या जिल्हा कमिटीला दिले आहेत. 

ज्या ठिकाणी काँग्रेसने युतीमध्ये योग्य वर्तन केले नाही, तिथे आम्ही त्यांना उडवून लावले आहे, असे ट्विट करत आंबेडकर यांनी काँग्रेसला स्पष्ट इशारा दिला आहे.

( नक्की वाचा : BMC Election 2026 : मुख्यमंत्रीपदापेक्षाही बीएमसीची खुर्ची मोठी? अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा मुंबईची माया भारी )

महानगरपालिका निवडणुकीत ताकद दाखवणार

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीत केवळ वंचित बहुजन आघाडी आणि भाजप हे दोनच पक्ष 50-50 टक्के उमेदवार उभे करण्याची क्षमता ठेवतात, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देखील वंचितने 50 टक्के जागांच्या वाटपाची मागणी केली आहे. मुंबईत आमचे अस्तित्व आणि ताकद मोठी असून तिथल्या 200 जागांवर लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी झाली असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

नवरदेव तयार पण लग्नासाठी प्रतीक्षा

युतीच्या चर्चेवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी एक मजेशीर उपमा दिली होती. सध्या आमचा नवरदेव तयार आहे आणि मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे, असे ते म्हणाले. सध्या केवळ चहापाण्याच्या चर्चा सुरू असून जेव्हा मुलगी पसंत पडेल तेव्हाच लग्न लावले जाईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आहे. 

काँग्रेससोबत मुंबईत अद्याप जागा वाटपावर कोणतीही ठोस चर्चा सुरू झालेली नाही आणि काँग्रेसकडून आघाडी जाहीर करण्याबाबत केवळ थांबा असे सांगितले जात असल्याने आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकीवर शंका

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र जाणार नाहीत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यामुळे आता कोणासोबत जायचे, याचा निर्णय आम्हालाच घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेस आणि वंचितमधील आघाडीची चर्चा दीर्घकाळापासून सुरू असली तरी, आंबेडकर यांच्या ताज्या भूमिकेमुळे आगामी महापालिका निवडणुकीत ही आघाडी होणार की वंचित स्वतंत्र लढणार, याबाबत आता राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com