सूरज कसबे, पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड परिसरातील किवळे येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'तू माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोस?' असा संशय घेत एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इमारतीच्या टेरेसवर घडला थरार
ही घटना विकासनगर, किवळे येथील सनव्ह्यू अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी निलेश बाबासाहेब साठे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली आहे. साठे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विक्रांत काशीनाथ कुसळे याला बेड्या ठोकल्या आहेत.
(नक्की वाचा- ओबीसींसाठी मोठी बातमी! नॉन-क्रिमी लेयरची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढणार? उपसमितीच्या बैठकीत काय घडलं?)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी फिर्यादी निलेश साठे आणि आरोपी विक्रांत कुसळे हे दोघेही एकाच इमारतीत वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळी निलेश साठे हे इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्याच वेळी तिथे आरोपी विक्रांत कुसळे आला.
संशयातून केला जीवघेणा हल्ला
टेरेसवर येताच विक्रांतने निलेश यांना गाठले आणि 'तू माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोस?' असा जाब विचारण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, विक्रांतने सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि निलेश साठे यांच्या डाव्या मांडीवर आणि पोटावर सपासप वार केले.
(नक्की वाचा- Ulhasnagar Crime: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकायचे अन्..., विठ्ठलवाडी पोलिसांकडून दोघांना अटक)
चाकूच्या हल्ल्यात निलेश साठे गंभीर रक्ताळलेल्या अवस्थेत कोसळले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी आरोपी विक्रांत कुसळे याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.