सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ आहे. पुण्यात देखील एका 82 वर्षीय निवृत्त नागरिकाला 10.7 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पुणे सायबर पोलिसांनी आता एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Reel Star) आणि त्याच्या प्रेयसीवर लक्ष केंद्रित केले आहे. या रील स्टारचे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात लाखो फॉलोअर्स आहेत.
काय आहे प्रकरण?
भांडारकर रोडवर राहणाऱ्या एका 82 वर्षीय वृद्धाला सायबर भामट्यांनी जानेवारी 2026 मध्ये लक्ष्य केले होते. आरोपींनी 'ट्राय' (TRAI), सीबीआय (CBI) आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाला फोन केला. त्यांच्या नावाचा वापर मनी लाँड्रिंगसाठी झाला असून अटक टाळण्यासाठी 'डिजिटल अरेस्ट' करण्यात येत असल्याचे भासवले गेले. घाबरलेल्या वृद्धाने सात व्यवहारांतून तब्बल 10.7 कोटी रुपये आरोपींच्या बँक खात्यात वळवले. यात त्यांच्या आयुष्याची संपूर्ण पुंजी आणि फिक्स डिपॉझिटचा समावेश होता.
(नक्की वाचा- Thane News: सेक्स रॅकेट प्रकरणात अभिनेत्रीला अटक; ज्युनियर कलाकारांना आमिष दाखवून करत होती फसवणूक)
रील स्टारचा या प्रकरणातील संबंध
पोलिसांनी याआधी हर्षद ढंतोले (23) आणि समर्थ देशमुख (24) या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे नाव समोर आले. फसवणुकीच्या रक्कमेतील मोठा हिस्सा या इन्फ्लुएन्सरच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या खात्यात जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुख्य आरोपींच्या सांगण्यावरून हा रील स्टार स्थानिक पातळीवर बँक खात्यांची व्यवस्था करत होता, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी या इन्फ्लुएन्सरच्या प्रेयसीची छत्रपती संभाजीनगरमध्ये चौकशी केली आहे. रीलमध्ये फिल्टर वापरल्यामुळे तिचा खरा चेहरा ओळखणे सुरुवातीला कठीण गेले होते, असे पोलिसांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Artificial Flowers: लग्नकार्यात सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर केल्यास होणार कारवाई; CM फडणवीसांची घोषणा)
आंतरराष्ट्रीय कनेक्शन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे धागेदोरे चीन आणि हाँगकाँगपर्यंत पोहोचले आहेत. चोरीचा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून परदेशात पाठवण्यात आला आहे. काही आरोपी थेट चीनमधील हँडलर्सच्या संपर्कात होते. पुणे पोलीस सध्या पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात या फरार इन्फ्लुएन्सरचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे सोशल मीडियावरील झगमगाटामागे दडलेले गुन्हेगारीचे काळं विश्व समोर आले आहे.