
Pune 3BHK 300 Cat : पुण्यातील (Pune Crime) एका घरात एक-दोन नव्हे तर तब्बल 300 मांजरी असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे महानगरपालिकेकडून यावर कारवाई करण्यात आली असून पुढील 48 तासात घरातून मांजरींना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसरमधील मार्व्हल बाऊंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील एका 3BHK फ्लॅटमध्ये एक महिला तब्बल 300 मांजरींना घेऊन राहते. याबाबत इमारतीतील रहिवाशांकडून गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. त्या फ्लॅटच्या जवळपास प्रचंड दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. याशिवाय फ्लॅटमधून वारंवार मांजरींच्या ओरडण्याचे आवाजही येत होते. तेथे घरकाम करणाऱ्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या फ्लॅटमध्ये 50-60 मांजरी होत्या. परिणामी आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी येत होती. याशिवाय रहिवाशांकडून आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती.
नक्की वाचा - GBS नंतर पुणेकरांना आणखी एक टेन्शन! शहारात डुकरांच्या गूढ मृत्यूचं सत्र, करण काय?
अखेर इमारतीतील रहिवाशांनी एकत्र येत पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासनाशी संपर्क करीत याबाबत तक्रार केली. आता प्रशासनाने यावर कारवाई केली असून या महिलेच्या घरातून तब्बल 300 मांजरी आढळल्या आहेत. या महिलेचं नाव रिंकू भारद्वाज असून मांजरींना पुढील 48 तासात हलवण्याची नोटीस देण्यात आली आहे. SPCA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर मालकीण आदेशाचे पालन करत नसेल, तर सर्व मांजरींना प्राणी आश्रयस्थळी हलवले जाईल. सध्या SPCA या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world