
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. महापालिकेनं नागरिकांच्या आरोग्याचं कारण देत शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले. दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या जवळ जैन समुदायातील प्राणी प्रेमी नागरिकांनी आंदोलन केलं. त्यानंतर आता हा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. उच्च न्यायालयानं बुधवारी (13 ऑगस्ट) रोजी झालेल्या सुनावतीत कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.
पुण्यातील धक्कादायक उदाहरण
मुंबईप्रमाणेच पुण्यातही कबुतरांना खाद्य देण्याचा मुद्दा गाजू लागला आहे. या प्रकरणात एका स्वयंसेवी संस्थेनं उच्च न्यायालयात धाव घेतलीय. प्राणी प्रेमी संघटना कबुतरांच्या हक्काबाबत आग्रही असतानाच पुणे शहरात कबुतरांमुळे आयुष्य गमवावं लागल्याचं एक दुर्दैवी उदाहरण समोर आलं आहे.
पुण्यातील माजी नगरसेवक शाम मानकर यांच्या मुलगी शीतल विजय शिंदे यांच्या मृत्यू या वर्षी जानेवारी महिन्यात झाला. शीतल या जगातून कबुतरांच्या विष्ठेमुळे झालेल्या फुफ्फुसांच्या फायब्रोसिसमुळे निघून गेल्या.
( नक्की वाचा : Dadar kabutar Khana: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदी कायम, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! )
43 वर्षीय शीतल 2017 पासून सतत खोकल्याने त्रस्त होत्या. त्यांनी खोकला कमी होण्यासाठी अनेक डॉक्टरांना दाखवलं. त्यावेळी त्यांना या आजाराचं मुळ कबुतरं असल्याचं लक्षात आलं. त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर काही लोक कबूतरांना दाणा टाकत असत. तिथे कबूतरांनी घरटी बांधली आणि वास्तव्य सुरू केले.
हळूहळू शीतल यांची प्रकृती बिघडत गेली. चालणे, श्वास घेणे, झोपणे सगळे कठीण झाले. शेवटी शीतल यांना 24 तास ऑक्सिजनवर ठेवावे लागले. डी.वाय. पाटील रुग्णालयात फुफ्फुस प्रत्यारोपणाचा प्रयत्न झाला, पण मॅचिंग फुफ्फुस मिळाले नाही. 19 जानेवारी 2025 रोजी पाठदुखीच्या तक्रारीवर रुग्णालयात दाखल झालेल्या शीतल यांनी त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला.
शीतलच्या आजारपणामुळे मानकर कुटुंबाने दोनदा घर बदलले होते…तोपर्यंत संसर्ग फुफ्फुसात आधीच पसरला होता. दहा वर्षांचा कबुतरांचा सहवास असाध्य रोग देवून गेला.
( नक्की वाचा : Stray Dogs: नागपूरमध्ये 10 पट वाढली भटक्या कुत्र्यांची संख्या, कोर्टाच्या आदेशानंतरही का बदलली नाही परिस्थिती? )
का होतो रोग?
डॉक्टरांनी मानकर कुटुंबाला दिलेल्या माहितीनुसार, कबुतरांची विष्ठा दोन-तीन दिवसांत वाळून पावडर बनते. ही पावडर हवेबरोबर मिसळून श्वसनमार्गे फुफ्फुसात जाते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांना गंभीर आजार होऊ शकतो.
कबुतरांची पावडर बनलेली विष्टा हवेतून घरात येते आणि संसर्ग पसरवते. ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना वर्षानुवर्षांनी लक्षणं दिसतात. शीतल यांनाही हेच झालं होतं. जगण्यासाठी अधिक व्यायाम करायल हवा असं डॅाक्टरांनी सांगितलं. शीतल नाकाला ॲक्सिजन लावून व्यायाम करत होत्या, पण त्यांचा प्रतिकार अपुरा ठरला.
शाम मानकर आता या धोक्याविषयी जनजागृती करत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कबूतरांची वाढती संख्या मोठा आरोग्यधोका ठरत आहे. प्रेक्षकांनो, तुमच्या परिसरात कबूतरांची संख्या जास्त असेल तर सावध राहा. दाणे टाकण्याऐवजी निसर्गाला त्याचं काम करू द्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world