अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News : राज्यात मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा संथ गतीने होत असल्याने शेतकऱ्यांसह विविध घटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील माळशेज घाट परिसरातही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेष म्हणजे दरवर्षी जनावरांच्या चाऱ्याच्या शोधात दूरवर भटकंती करणारा धनगर समाज आता आपल्या गावांकडे परतू लागला आहे. मात्र यंदा परतीच्या प्रवासातही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. याबाबतचा हा विशेष वृत्तांत.
शेतीसह धनगर समाजावरही परिणाम...
माळशेज घाट परिसर म्हणजे पावसाळ्यात निसर्गसौंदर्याने नटणारा आणि धबधब्यांनी बहरणारा प्रदेश. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यातच या भागात मान्सून सक्रिय होतो. मात्र यंदा जूनचा तिसरा आठवडा सुरू असूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. याचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे तर भटक्या धनगर समाजावरही होताना दिसत आहे. दरवर्षी धनगर बांधव आपल्या बकऱ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे घेऊन चाऱ्याच्या शोधात घाटमाथा, नगर जिल्हा, कोकणपट्टा आणि विविध भागांत स्थलांतर करतात. पावसाळा सुरू होण्याच्या काळात हिरवागार चारा उपलब्ध होईल या अपेक्षेने ते पुन्हा आपल्या मूळ गावांकडे परतू लागतात.
सध्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरीसह विविध भागातील धनगर कुटुंबे माळशेज घाटाच्या वाटा चढत आपल्या गावांकडे परतताना दिसत आहेत. मात्र या प्रवासादरम्यानही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. घाटात ढगांची गर्दी होत असली तरी अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. पावसाअभावी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे धनगर समाजामध्ये चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवत असून जनावरांचे संगोपन करणे आव्हानात्मक बनत आहे.
धनगर समाजामध्ये पारंपरिक श्रद्धांनाही विशेष महत्त्व आहे. पावसासाठी देवतांची आराधना, पारंपरिक नृत्य आणि धार्मिक विधी करून चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली जात आहे. यंदाही अनेक धनगर बांधव आपल्या कुलदैवताकडे आणि निसर्गदेवतांकडे वेळेवर पाऊस पडावा अशी प्रार्थना करताना दिसत आहेत. पावसाची प्रतीक्षा केवळ शेतकरी, व्यापारी किंवा सामान्य नागरिकांपुरती मर्यादित नाही, तर भटक्या आणि पशुपालक समाजाच्या जीवनाशीही ती थेट जोडलेली आहे. माळशेज घाटातील ही दृश्ये ग्रामीण आणि भटक्या जीवनातील वास्तव अधोरेखित करत असून, वेळेवर आणि समाधानकारक पावसाची गरज किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world