- अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune News: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात एका चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जेवणासाठी हॉटेलसमोर कार उभी केलेल्या एका प्रवाशाची नजर चुकून चोरट्याने गाडीची काच फोडली आणि आतील तब्बल 1 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
पाबळ परिसरात हॉटेलबाहेर नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी आपल्या कारने पाबळ परिसरातून जात असताना जेवणासाठी एका हॉटेलसमोर थांबले होते. त्यांनी आपली कार हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली आणि ते आत जेवण्यासाठी गेले. हीच संधी साधून एका चोरट्याने कारच्या जवळ घुटमळण्यास सुरुवात केली. आजूबाजूला कोणीही नसल्याचे पाहून चोरट्याने काही क्षणात कारची काच फोडली आणि आत ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड पळवली.
(नक्की वाचा: Pune News: 'पुण्यातील पाषाण तलावात 4-5 दिवसांपासून...' सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली मोठी भीती VIDEO VIRAL)
सीसीटीव्हीत कैद झाला चोरटा
काही वेळाने प्रवासी जेवण करून परतले असता, त्यांना कारची काच फुटलेली दिसली. गाडीची तपासणी केली असता आतील रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात एक संशयित व्यक्ती कारजवळ येताना, काच फोडून आत हात घालून पैसे काढताना स्पष्टपणे दिसत आहे. अवघ्या काही मिनिटांतच हा सर्व प्रकार घडला.
(नक्की वाचा: Nashik News: नाशिक हादरले! ट्रकने 100 फूट फरफटत नेले अन् पिकअप व्हॅनला लागली भीषण आग, 4 जणांचा जळून मृत्यू)
पाहा व्हिडीओ
पोलीस तपास सुरू
चोरीची खात्री पटताच वाहनधारकाने तत्काळ स्थानिक पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली आहेत. भरवस्तीत आणि हॉटेलसमोर अशा प्रकारे चोरी झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.