- पुणे विमानतळावर एका विमानात बॉम्ब असल्याची निनावी फोनद्वारे माहिती मिळाल्यानंतर उड्डाण थांबवण्यात आले
- बॉम्ब असलेल्या विमानात प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आणि विमानाची तपासणी सुरू करण्यात आली
- विमानतळ प्रशासन, बॉम्ब शोध पथक आणि सीआयएसएफ यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आणि बंदोबस्त वाढवण्यात आला
अविनाश पवार
पुणे विमानतळावर आज रात्री मोठी खळबळ उडाली आहे. पुणेहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला उड्डाणापासून थांबवण्यात आलं. एका विमानात बॉम्ब असल्याची निनावी फोनद्वारे माहिती देण्यात आली आहे. ज्या विमानात बॉम्ब ठेवला आहे हे सांगण्यात आलं होतं, ते पुण्याहून मुंबईला जाणारं विमान होतं. संबंधित विमान तातडीने थांबवण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे.
विमानात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. शिवाय हे विमान बॉम्बने उडवणार असल्याची ही एक धमकी होती. धमकी मिळताच विमानतळ प्रशासन,बॉम्ब शोध पथक,सीआयएसएफ तसेच इतर तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या. विमानतळाचा बंदोबस्त ही वाढवण्यात आला. त्यानंतर संबंधी विमानाची सखोल तपासणी सुरू करण्यात आली. त्या आधी सर्व प्रवाशांनी विमानातून खाली उतरवण्यात आलं.
त्यानंतर विमानाचा ताबा सुरक्षा यंत्रणांनी घेतला. प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही धमकी आहे की अफवा आहे याबाबत विमानतळ परिसरात या घटनेनंतर चर्चा रंगली होती. पोलीस यंत्रणाही तातडीने कामाला लागली आहे. याचा तपास सुरू असून, तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित विमानाची उड्डाण प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे. अधिकृत तपासानंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे. त्यानंतर विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world