अविनाश पवार, पुणे
जुन्नर शहरात बुधवारी सकाळी एका तरुणीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश डामसे याने गुरुवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला आणि शेवटी स्वतःचेही आयुष्य संपवले.
वस्तीगृहाबाहेर गाठून केला हल्ला
महेश डामसे याचे संबंधित तरुणीवर प्रेम होते, मात्र तिने लग्नासाठी नकार दिला होता. या नकाराचा राग मनात धरून महेशने तिचा काटा काढण्याचे ठरवले. बुधवारी सकाळी तरुणी आपल्या वस्तीगृहातून महाविद्यालयाकडे निघाली होती. जुन्नरमधील सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशने तिला गाठले. महेशने सोबत आणलेल्या कोयत्याने तरुणीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
(नक्की वाचा- Bhandara News: लग्नाच्या घरात सनई-चौघड्यांऐवजी आक्रोश; नवरदेवाने लग्नाआधीच संपवलं आयुष्य!)
आरोपी तरुणाची आत्महत्या
हल्ला केल्यानंतर महेश डामसे तिथून फरार झाला होता. जुन्नर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता, आज सकाळी एका टेकडीवर त्याची दुचाकी आढळली. दुचाकीच्या काही अंतरावरच महेशने एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, महेश त्या टेकडीवर एकटाच गेल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे ही आत्महत्या असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
(नक्की वाचा- शासकीय रुग्णालयात रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिली तर खैर नाही! मंत्री हसन मुश्रीफांचा कडक इशारा)
तरुणीची प्रकृती चिंताजनक
गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने जुन्नरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला होता. आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world