Pune Mahapalika Election 2026 : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यात राजकीय खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेकडून (शिंदे गट) इच्छूक उमेदवार पद्मा शेळके यांनी त्यांचा अधिकृत एबी फॉर्म दुसऱ्याच कुणीतरी चोरून नेल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पक्षाने आपल्याला उमेदवारी जाहीर केली होती, मात्र फॉर्म हातात येण्यापूर्वीच तो गायब झाल्याने पद्मा शेळके यांनी टाहो फोडला.
'माझा फॉर्म मला परत द्या!'
पद्मा शेळके यांनी आरोप केला आहे की, त्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागात मेहनत करत आहेत. पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून एबी फॉर्म दिला होता. मात्र, तो फॉर्म चोरून दुसऱ्याच एका उमेदवाराला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
(नक्की वाचा- Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?)
या प्रकारानंतर त्यांनी तात्काळ नेत्या नीलम गोऱ्हे आणि विजय शिवतारे यांच्याकडे धाव घेऊन न्याय मागितला. मात्र, तिथून कोणताही ठोस दिलासा न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. वरिष्ठांकडे विनवणी करूनही काही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी काम केले नाही त्यांना फॉर्म मिळाले, पण माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाला," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पोलीस ठाण्यात तक्रार करणार
आपल्या मेहनतीचे चीज होत असताना ऐनवेळी अशा प्रकारे एबी फॉर्म गायब झाल्याने पद्मा शेळके यांनी आता पोलिसात तक्रार करणार असल्याचे म्हटलं आहे. "माझ्या फॉर्मवर माझे नाव आहे, तो मला परत मिळालाच पाहिजे," अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
(नक्की वाचा- Pune News: बैठका, चर्चा, वाटाघाटी सगळं व्यर्थ; पुण्यात शिवसेना-भाजप युती अखेर तुटली; काय आहेत कारणे?)
पुण्यात एबी फॉर्मचा गोंधळ
पुणे महापालिकेच्या अनेक प्रभागांमध्ये सध्या एबी फॉर्मवरून प्रचंड ओढाताण सुरू आहे. अनेकांना तिकीट न मिळाल्याने नाराजी आहे, तर काही ठिकाणी एकाच प्रभागातून दोन-दोन जणांना फॉर्म मिळाल्याचीही चर्चा आहे. पद्मा शेळके यांच्या या आरोपामुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.