पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये भरधाव पोर्शे कारनं दोन सॉफ्टेवेयर इंजिनियर्सना (Software Engineer) उडवणाऱ्या 17 वर्षांच्या आरोपीला बाल हक्क बोर्डाच्या आदेशानुसार (Juvenile Justice Board) बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या केंद्रात सध्या 30 पेक्षा जास्त अल्पवयीन आहेत. कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री उशीरा या अल्पवयीन तरुणानं मोटारसायकवरुन जाणाऱ्या दोन जणांना उडवलं. त्यावेळी आरोपी नशेत असल्याचा दावा पोलिसांनी केलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील या प्रकरणाच्या आरोपीवर सज्ञान समजून केस चालवावी की नाही यावर बाल हक्क बोर्डानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यांनी यापूर्वीचा निर्णय बदलत आरोपीला 5 जूनपर्यंत रिमांड होममध्ये पाठवलं आहे. या रिमांड होममध्ये त्याचा दिवस कसा असेल ते पाहूया
सकाळी 8 ते 10 - नाश्टा (पोहे, उपमा, अंडे, दूध)
सकाळी 11 - प्रार्थना
सकाळी 11 - प्रार्थनेनंतर भाषेचा अभ्यास
दुपारी 1 ते 4 - विश्रांती
दुपारी 4 - नाश्टा
दुपारी 4 ते 5 - टीव्ही
संध्याकाळी 5 ते 7 - खेळण्याचा कालावधी (व्हॉलीबॉल, फुटबॉल)
संध्याकाळी 7 - रात्रीचं जेवण
रात्री 8 - हॉस्टेलमध्ये परत जाणे
जेवणामध्ये भाजी, चपाती, आणि भात यांचा समावेश असेल
याबाबत बालसुधारगृहाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'अल्पवयीन आरोपीला नेहरु उद्योग बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तिथं अन्य किशोरवयीन मुलं देखील आहेत.' या केंद्रामध्ये त्याच्या मानसिक स्थितीची समीक्षा करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
( नक्की वाचा : पुणे पोर्शे अपघात : जामीन मिळाल्याच्या खुशीत माजोरड्या आरोपीचं रॅप साँग? )
2 महिने लागणार...
या प्रकरणातील आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अल्पवयीन तरुणाला सज्ञान समजावं की नाही हे निश्चित होण्यासाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागेल. या प्रकरणात मानसोपचारतज्ज्ञांसह वेगवेगळ्या संबंधित तज्ज्ञांकडून अहवाल मागवण्यात येईल. त्यानंतर बोर्ड निर्णय देईल. या कालावधीत अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात ठेवण्यात येईल. तिथं राहण्याचे काही निकष निश्चित केले जातील.'
विशाल अग्रवालला पोलीस कोठडी
पोलसांनी अल्पवयीन आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेमधील कलम 304 (कोणत्याही हेतूशिवाय हत्या), 304 (ए) निष्काळजीपणे हत्या, 279 ( निष्काळजीपणे वाहन चालवणे) त्यासह मोटार वाहन अधिनियमातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि हॉटेल ब्लॅक क्लबचे दोन कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश गावकर यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
( नक्की वाचा : अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आखला होता पळून जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी कसा उधळला? )
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार अग्रवाल यांनी मुलाकडं ड्रायव्हिंग लायसन्स नाही हे माहिती असूनही त्याला कार दिली होती. त्याचबरोबर मुलगा दारु पितो याची कल्पना असूनही अग्रवाल यांनी त्याला पार्टीची परवानगी दिली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world