ईडीच्या भीतीचा मुद्दा;  भुजबळ, अजित पवारांसह भाजपलाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न?

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्या पुढील अडचणी वाढताना दिसत आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

Chhagan Bhujbal : ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या पुढील अडचणी वाढताना दिसत आहेत. एका वर्तमानपत्राने एका आगामी पुस्तकाचा हवाला देत भुजबळांच्या मुलाखतीतील विधान छापले आहे. छगन भुजबळ यांच्याविरोधात ईडीसह तपास यंत्रणांनी कारवाई केली होती. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांना अटकही झाली होती. या सर्व प्रकाराबाबत बोलताना भुजबळांनी एक विधान केल्याचे आगामी पुस्तकात छापण्यात आले आहे. याची बातमी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. "भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण ईडीपासून सुटका. माझ्यासाठी ईडीपासून सुटका ही एकप्रकारे पुनर्जन्म होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्यामागे लागल्या. उच्च जातीचा असतो तो मला असे वागवले नसते" असे भुजबळांचे विधान होते आणि ते पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आले आहे असे बातमीत म्हटले होते.  

वकिलांसोबत चर्चा करणार - छगन भुजबळ

या वृत्ताचे खंडण करण्यासाठी भुजबळांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. ज्यात त्यांनी म्हटले की, "मी पुस्तक वाचलेले नाही, ते मिळवून मी वाचेन. त्यात काय लिहिलंय ते वकिलांद्वारे देखील विचारविमर्श करेन. माझा फोकस हा प्रचारावर आहे. सात - आठ दिवसांनंतर चे चुकीचं आहे, त्याविरोधात मला जी कारवाई करता येईल ती मी करेन." उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्येही या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, "या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जातात. लोकसभा निवडणुकीपूर्वी संविधान बदलणार, असे सांगितले गेले आणि ते लोकांना पटले. सीएएचा कायदा आला तेव्हा इथल्या मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांग्लादेशात पाठवण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचे पसरवण्यात आले. मुद्दे राहिले नाहीत, मात्र तरीही सत्ता मिळवण्यासाठी हे फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्न सुरू असतात."

Advertisement

(नक्की वाचा: देशात भाजपा असेपर्यंत अल्पसंख्याकांना आरक्षण मिळणार नाही, अमित शाहांचं काँग्रेसला उत्तर)

मला राजकारणात रस नाही - राजदीप सरदेसाई

ज्या पुस्तकाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, ते पुस्तक पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिलेले आहे. त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी म्हटले की,"पुस्तकात राजकीय घडामोडींसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. भुजबळांनीही स्पष्टीकरण दिले आहे. पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा. मला राजकारणात रस नाहीये, मी पत्रकार आहे. पुस्तकाचे राजकारण करायचे त्यांना करू द्या. भुजबळांबद्दल मला आदर आहे. माझी विनंती आहे की तुम्ही पुस्तक वाचा."

Advertisement

(नक्की वाचा: 'मोदींना महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली' पवारांनी तोफ डागली)

भुजबळांनी कायदेशीर कारवाई करण्याची भाषा वापरली आहे तर अजित पवारांनी हे फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांनी खासगीमध्ये सांगितले की, पुस्तकाचा कथित तपशील प्रसिद्ध करत फेर नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न असून याद्वारे एकाच दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिला म्हणजे निवडणूक लढवत असलेल्या भुजबळांच्या राजकारणाला धक्का पोहोचवणे, दुसरा म्हणजे त्यांच्या पक्षाचे प्रमुख असलेल्या अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे आणि तिसरा म्हणजे ओबीसींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या भाजपची प्रतिमा ओबीसी मतदारांमध्ये मलिन करणे आहे का? अशी चर्चा आहे.   

Advertisement

(नक्की वाचा: मावळ पॅटर्नचा फटका महायुतीच्या सुनील शेळके यांना बसणार? गणित काय?)

मराठा विरूद्ध ओबीसी वादाची किनार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय आमच्यासाठी चांगला आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. जरांगे यांच्या भूमिकेचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता. मराठा मते आपल्याकडेच राहावीत यासाठी मविआ नेते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी मविआच्या नेत्यांनी जरांगेंची भेट घेतल्याचेही पाहायला मिळाले होते. दुसरीकडे भाजपने आपला डीएनए ओबीसींचा असल्याचं अनेकदा म्हटलंय. मराठा समाजाची मागणी ही ओबीसीतून आरक्षण मिळावी अशी आहे. ओबीसी नेत्यांचा याला विरोध आहे. यावरून मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. भुजबळांनी अनेकदा जरांगेंवर सडकून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर 'ओबीसी असल्याने मला त्रास दिला' असे भुजबळांचे कथित विधान प्रसिद्ध करत भुजबळांसह भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना संशय आहे की हा सगळा विरोधकांनी रचलेला कट आहे.